बांदा, मळगावला वादळाचा तडाखा
By Admin | Updated: May 21, 2014 17:38 IST2014-05-21T00:51:40+5:302014-05-21T17:38:12+5:30
वाहतूक विस्कळीत

बांदा, मळगावला वादळाचा तडाखा
सावंतवाडी, बांदा, तळवडे : बांदा शहर व परिसराला काल, सोमवारी रात्री वादळी पावसाने झोडपून काढले. पडवे-माजगाव येथे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वीज वितरण कंपनीच्या वीजवाहिनी तुटल्याने तब्बल बारा तास हा परिसर काळोखात होता. तसेच निरवडे-मळगाव परिसरातही वादळाचा तडाखा बसला असून काही ठिकाणी पडझड झाल्याचीही नोंद आहे. मात्र, जीवितहानी झाली नाही. गेले दोन दिवस बांदा परिसरात अवकाळी पाऊस कोसळत आहे. सोमवारी रात्री पावसाने कहरच केला. विजांच्या लखलखाटासह बांदा परिसरात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला. पडवे, माजगाव येथे काजू, आंब्याची झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने आज, मंगळवार सकाळी या रस्त्यावरील वाहतूक काही वेळ बंद होती. स्थानिकांनी आज झाडे बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. बांदा परिसरातील वीजवाहिनीच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा रात्रभर बंद होता. इन्सुली येथील विद्युत जनित्र वीज कोसळून जळाल्याने बांदा शहरात कमी दाबाने वीज पुरवठा सुरू होता. या जनित्राच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री पुन्हा पावसाला प्रारंभ झाल्याने याचा फटका वीज वितरण कंपनीला बसला. ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने वाहिनी तुटल्याने बांदा शहरासह दशक्रोशीतील वीजपुरवठा तब्बल बारा तास बंद होता. या अवकाळीने शेतकर्यांनाही मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले. (प्रतिनिधी)