निकृष्ट पाईपलाईनचे काम बंद पाडले
By Admin | Updated: January 6, 2015 01:19 IST2015-01-06T01:19:38+5:302015-01-06T01:19:56+5:30
भाजपा कार्यकर्ते आक्रमक : ठेकेदाराचे नियमाप्रमाणे काम करण्याचे आश्वासन

निकृष्ट पाईपलाईनचे काम बंद पाडले
दोडामार्ग : मणेरी नदीचे पाणी वेंगुर्लेपर्यंत नेण्यासाठी घालण्यात येत असलेल्या पाईपलाईनचे काम योग्य पध्दतीने निमयाप्रमाणे होत नसल्याने सासोली येथे जात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांच्या नेतृत्वाखाली हे काम बंद पाडले.
यावेळी पोटठेकेदार म्हणून काम करणारे शिवसेनेचे विभागप्रमुख सज्जन धाऊसकर व राजेंद्र म्हापसेकर यांच्यात काम बंद पाडल्याच्या कारणास्तव शाब्दिक चकमक उडाली. अखेर पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांच्या शिष्टाईनंतर ठेकेदार देशपांडे याने नियमाप्रमाणे काम करण्याचे आश्वासन दिले. मात्र, तोपर्यंत काम बंद ठेवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिला.
तिलारी नदीचे पाणी मणेरी येथे अडवून ते वेंगुर्लेपर्यंत नेण्यासाठी पाईप लाईनचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. सासोली ते आडाळी दरम्यान ११ फूट खोल चर खोदून पाईप लाईन टाकली जात आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला चार खोदण्यात आला आहे. पाईप टाकल्यानंतर त्यावर माती ओढताना पाणी मारून मातीचे तीन थर लावून रोलरने पिचींग केल्यानंतरच पाईप लाईन बुजविणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने पावसाळ्यात ही माती रस्त्यावर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या पाईप लाईनचे काम नियमाप्रमाणे करण्यात यावे, अशी सूचना चार दिवसांपूर्वी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी केली होती.
परंतु तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत पाईप लाईनचे काम सोमवारी सुरू करण्यात आले. त्याची माहिती म्हापसेकर यांना समजताच त्यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धडक दिली व जोपर्यंत नियमाप्रमाणे काम होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याची सूचना केली. यावेळी सेनेचे विभागप्रमुख सज्जन धाऊसकर त्याठिकाणी आले. या कामाचा पोटठेका माझ्याकडे आहे. तुम्हाला आम्ही काम अडवू देणार नाही. तुम्ही संबंधित यंत्रणेशी भांडा, असे सांगितले. यावेळी म्हापसेकर यांनी, तुम्ही जर पोटठेकेदार आहात, तर तुम्हीच तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा. जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत काम सुरू करता येणार नाही. जर एखादा अपघात झाला असता, तर त्याला जबाबदार कोण? असे सांगितले. त्यामुळे म्हापसेकर व धाऊसकर यांच्या काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी म्हापसेकर यांनी, आमचा स्थानिकांना विरोध नाही. पण काम नियमाप्रमाणे झालेच पाहिजे, अशी भूमिका मांडली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सूर्यवंशी यांनी ठेकेदार देशपांडे यांना काम नियमाप्रमाणे करण्याची सूचना केली. देशपांडे यांनीही नियमाप्रमाणे काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले. मात्र, तोपर्यंत काम बंदच ठेवण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. यावेळी सभापती महेश गवस, उपसभापती आनंद रेडकर, चेतन चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)