सिंधु महोत्सवाची उधळपट्टी थांबवा
By Admin | Updated: December 23, 2014 23:42 IST2014-12-23T22:22:06+5:302014-12-23T23:42:53+5:30
मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ‘तो’ निधी शेतकऱ्यांना द्या

सिंधु महोत्सवाची उधळपट्टी थांबवा
सिंधुदुर्गनगरी : प्रशासनामार्फत मालवण येथे जानेवारी महिन्यात सिंधु महोत्सव आयोजित करण्यात आला असून यासाठी १ कोटी रूपये खर्च होणार आहे. ही कोटीची होणारी उधळपट्टी थांबवावी व हा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे भेटीदरम्यान केली.
निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनामार्फत मालवण येथे सिंधु महोत्सव होत असून त्यासाठी एक कोटी रूपये खर्च येण्याची शक्यता आहे.
या निधीची उधळपट्टी करण्यापेक्षा तो शेतकऱ्यांच्या मदतीला द्या, अशी मागणी यावेळी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायती व शेतीचे हत्तीने नुकसान केली. या नुकसानीतून मिळणारी अल्प मदतही शेतकऱ्यांना मिळालेली नसून त्याचा सुमारे ३५ लाखाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील शेतकरी या नुकसानीमुळे हवालदिल झालेले आहेत.
तसेच विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व वेगवेगळ््या हवामानाच्या कारणाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुमारे ५ हजारपेक्षा जास्त गावे शासनास दुष्काळग्रस्त घोषित करीत असताना सुमारे ७०० हून अधिक आत्महत्याही विदर्भ, मराठवाड्यात झाल्याच्या नोंदी आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी महोत्सव साजरे करून परजिल्ह्यातून येणारे मंडप, लाईट, साऊंड यांचे ठेकेदार तसेच वेगवेगळ््या क्षेत्रातील कलाकारांच्या नाचगाण्यांवर पैशाची उधळपट्टी करणे उचित वाटत नाही. कोट्यवधी निधीचा वापर शेतकऱ्यांना मदत स्वरूपात करावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष नारायण कुबल, तात्या पवार, समीर आचरेकर, शैलेश वेरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)