देवस्थान जमीनप्रश्नी आचरा तिठ्यावर रास्ता रोको
By Admin | Updated: July 16, 2015 22:58 IST2015-07-16T22:58:37+5:302015-07-16T22:58:37+5:30
स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणार : न्यायासाठी लढा देण्याचा निर्णय

देवस्थान जमीनप्रश्नी आचरा तिठ्यावर रास्ता रोको
आचरा : आचरा गावच्या सातबारामध्ये महसूल विभागाकडून चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले फेरफार रद्द करून ते महसूल विभागाकडून ग्रामसभेने मागणी करूनही पूर्ववत केले जात नसल्याने येत्या १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी आचरा तिठा मार्गावर आचरावासियांनी रास्ता रोको करण्याचा निर्धार केला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना २० जुलै रोजी दिले जाणार आहे. स्वातंत्र्यात असून जमिनीचा मालकी हक्क कुळांना प्राप्त होत नसल्याने स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ध्वजारोहणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आचरावासियांनी आंदोलनाच्या दिशा ठरविण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत घेतला.
ही बैठक आचरा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरपंच मंगेश टेमकर, उपसरपंच साक्षी ठाकूर, माजी सरपंच राजन गावकर, अनिल करंजे, ग्रामपंचायत सदस्य अवधूत हळदणकर, चंदन पांगे, परशुराम शेट्ये, श्रद्धा सक्रू, रेश्मा कांबळी, संचिता आचरेकर, समीर ठाकूर, जगदीश पांगे, मंदार खोबरेकर, विठ्ठल धुरी, जुबेर काझी, बबन सक्रू, सीमा घाडी, विजय जोशी आदी उपस्थित होते.
आचरा देवस्थान जमीनप्रश्नी माहिती देताना सरपंच मंगेश टेमकर म्हणाले की, फेरफार क्र. २५९५, ३१७३, १४५५ हे तत्कालीन ग्रामसेवक व तत्कालीन कमिटीदार यांनी दिलेल्या वर्दी अर्जानुसार तयार झाले आहेत. हे फेरफार चुकीचे झालेले असल्याने याबाबत मागील १५ आॅगस्ट २०१४ व २० नोव्हेंबर २०१४ च्या ग्रामसभेत फेरफार रद्द करून सातबारा पूर्वस्थित आणावा यासाठी मागणी करत २६ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठोस निर्णय न देता संबंधित न्यायालयात अपील दाखल करून योग्य न्याय निर्णय घ्यावा असे सुचवले होते.
परंतु उपविभागीय अधिकारी (महसूल) कुडाळ यांचा आचरावासियांना निर्णय मान्य नसून फेरफार बदल करताना खातेदारांना अथवा कुळ वहिवाटदारांना कोणतीही पूर्व सूचना न देता तत्कालीन मामलेदारांनी स्वत:च्या अधिकारात कोणत्याही शासन मान्यतेशिवाय संगनमताने गाव इनामाचा फेरफार केलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेले परिपत्रक बनावट परिपत्रक नंबराने हा फेरफार करून दिशाभूल केलेली आहे. स्वातंत्र्यानंतर गाव इनाम देण्याची ही चूक तत्कालीन तहसीलदार यांनी केली असून शासन स्तरावर शासकीय अधिकाराने केलेली चूक दुरुस्त करून सातबारा पूर्ववत करून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जाणार असून १२ आॅगस्टपूर्वी मागणी पूर्ण न झाल्यास १५ आॅगस्ट रोजी रास्ता रोको व ध्वजारोहणावर बहिष्कार घालणार असल्याची माहिती बैठकीत सरपंच यांनी दिली. यावेळी आचरा ग्रामपंचायतीच्यावतीने आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली. (वार्ताहर)
१५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. परंतु पिढ्यानपिढ्या जमीन कसणाऱ्या कुळांना त्यांचे हक्क प्राप्तच होत नसतील तर स्वातंत्र्य कसले? सध्याचे कमिटीदार हेच मालक असल्याने त्यांनी कुळे नष्ट करायला सुरुवात केली आहे. यापूर्वी होणारी जमीन तारण, खरेदी विक्री बंद झाली आहे. असे पारतंत्र्यातले जीवन जगताना स्वातंत्र्यदिन का साजरा करावा? असा सवाल ग्रामस्थांनी केला. येणारा स्वातंत्र्यदिन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत साजरा न करण्याचा निर्णय करत गावातील ध्वजारोहणावर बहिष्कार टाकत स्वातंत्र्यदिन आचरा गावात साजरा होऊ न देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी या बैठकीत केला.