‘हत्ती हटाव’साठी महामार्ग रोको
By Admin | Updated: November 30, 2014 00:49 IST2014-11-30T00:46:20+5:302014-11-30T00:49:53+5:30
एक तास वाहतूक ठप्प : १० डिसेंबरपर्यंत मोहीम; आश्वासनानंतर आंदोलन मागे

‘हत्ती हटाव’साठी महामार्ग रोको
कुडाळ : ‘हत्ती हटाव, मनुष्य बचाव’, अशा घोषणा देत वेताळबांबर्डेवासीयांसह अन्य हत्ती बाधित गावांतील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी १० डिसेंबरपर्यंत हत्ती हटाव मोहीम सुरू करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात सहभागी २५0 ग्रामस्थांवर कुडाळ पोलिसांनी बेकायदेशीररीत्या जमाव करीत रास्ता रोको केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात दाखल झालेल्या हत्तींनी आता उग्ररूप धारण केले असून, कुडाळ तालुक्यातील जनता भीतीच्या छायेखाली वावरत आहे. वनविभाग मात्र हत्तींच्या बंदोबस्तासाठी कोणत्याच उपाययोजना राबवित नसल्याने त्या विरोधात जनतेने आवाज उठविला आहे. याच अनुषंगाने वेताळबांबर्डे व आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांनी आज, शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास वेताळबांबर्डे तिठा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी सरपंच रोहिणी चव्हाण, पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, दादा साहील, बाबूराव चव्हाण, अवधूत सामंत, शांताराम गावडे, मोहन परब, रामचंद्र घाडी, सचिन गावडे, संजय पोळ तसेच शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या सहायक उपवनसंरक्षक एस. वाय. कुलकर्णी व कुडाळचे वनक्षेत्रपाल संजय कदम यांना आंदोलनकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार करीत धारेवर धरले. कुलकर्णी यांनी, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करण्यात येईल, वाढीव मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, तसेच १० डिसेंबरपर्यंत हत्ती हटाव मोहीम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)
२५0 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल
बेकायदेशीररीत्या जमाव करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, अशी नोटीस कुडाळ पोलिसांतर्फे बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही झालेल्या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. याविरोधात कुडाळ पोलिसांनी आंदोलनकर्त्या सुमारे २५0 नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे.