आंबोलीत डॉक्टरांअभावी रूग्णांचे हाल प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती : ग्रामस्थ आक्रमक, तीव्र आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत
By Admin | Updated: May 10, 2014 00:01 IST2014-05-10T00:01:34+5:302014-05-10T00:01:34+5:30
महादेव भिसे ल्ल आंबोली आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला महिनाभर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना मानसिक,

आंबोलीत डॉक्टरांअभावी रूग्णांचे हाल प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती : ग्रामस्थ आक्रमक, तीव्र आंदोलन छेडण्याच्या मनस्थितीत
महादेव भिसे ल्ल आंबोली आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला महिनाभर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेचा व प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून येत्या आठ दिवसात तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. आठ दिवसांपूर्वी आंबोली ग्रामस्थांकरवी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिकेवर चालक नेमणुकीसाठी उपोषण करण्यात आले होते. परंतु या उपोषणाचीे कोणतीही दखल वैद्यकीय अधिकार्यांकडून घेण्यात आली नाही. याउलट तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक केलेले मळेवाडचे डॉक्टर करीबळे यांनी उपोषणाच्या दुसर्या दिवशीच रजा टाकून पळ काढला. त्यामुळे इथल्या रुग्णांचे आणखी हाल होत आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंबोलीतील भर बाजारपेठेत एक २६ वर्षीय विवाहीत महिला पूजा प्रवीण राऊत (कुडाळ- वालावल) या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे वैद्यकीय अधिकारीच नसल्याने परिचारिकेने त्या महिलेवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी सावंतवाडी येथे जाण्यास सांगितले. याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या जिल्हाधिकार्यांसोबत मिटींगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले. तर सरपंचांना सामान्यांच्या या हेळसांडीबाबत काही तोडगा काढणार का, असे विचारल्यास जनतेच्या प्रश्नांबाबत काहीच देणेघेणे नसल्याप्रमाणे ते उलट उत्तरे देतात. सरपंचांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य आत्माराम पालेकर हे रुग्ण कल्याण नियामक समितीचे अध्यक्ष आहेत. परंतु त्यांना तर आरोग्य केंद्राच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळच नसल्याचे दिसून येत आहे. पंचायत समिती सदस्या रोहिणी गावडे यांचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे. तर आमदारांकडून केवळ आश्वासनेच मिळतात, असे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचे मत आहे. आंबोलीत येणार्या चांगल्या डॉक्टर्सना येथील काही राजकारणी मानपानावरून बदली करवून घालवून देत असल्याचे समोर आले आहे. एकंदरीत डी. एच. मोरे यांच्या गलथान कारभारामुळे आंबोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्र मृत्यूशय्येवर आहे. या प्राथमिक कें द्रावर अवलंबून असलेल्या चौकुळ, गेळे या गावातील रुग्णांना आता केवळ देवच वाली उरला आहे. तब्बल १८ कर्मचारी आणि एकही डॉक्टर नाही, अशी भयानक अवस्था आरोग्य केंद्राची असून पाच लाखापेक्षा जास्त वेतन निधी शासन या आरोग्य केंद्रावर अक्षरश: वाया घालवित आहे. चार उपकेंद्रांच्या प्रमुख असलेल्या आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला आता वाली कोण? असा प्रश्न यामुळे जनतेला पडला आहे.