तिलारी प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: April 16, 2015 00:05 IST2015-04-15T23:20:42+5:302015-04-16T00:05:30+5:30
वनटाईम सेटलमेंट प्रश्न सोडविण्याची मागणी

तिलारी प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन
साटेली भेडशी : तिलारी प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी तिलारी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर पुन्हा एकदा ठिय्या आंदोलन केले आणि ज्यांनी फसवणूक केली, ते शब्दाला जागले नाहीत, त्यांच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी घोषणाबाजी केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकाआधी खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला शब्द पाळला नाही आणि निवडून गेल्यापासून प्रकल्पग्रस्तांची साधी विचारपूसही केली नाही.
तिलारी प्रकल्पग्रस्तांनी आज कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले, मी प्रकल्पग्रस्तांची पूर्णपणे यादी पाठविली आहे. माझ्या हातात काहीच नाही, असे सांगून हात झटकले. उद्या १६ एप्रिल रोजी सकाळी सातही गावातील प्रकल्पग्रस्त पुन्हा एकदा एकत्र येऊन ठिय्या आंदोलन करतील. तोपर्यंत वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला.
तिलारी प्रकल्पग्रस्त बुधवारी तिलारी येथे एकत्र जमले होते. परंतु एकाही पदाधिकाऱ्याने साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे एकेवेळी तुम्हाला न्याय मिळवून देऊ, तुमच्याबरोबर जलसमाधी घेऊ असे सांगणारे पदाधिकारी आज कोठे गेले, याची चर्चा प्रकल्पग्रस्तांमध्ये होती. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत गवस, सचिव संजय नाईक, लक्ष्मी गवस, राजेंद्र गवस, अरुण गवस, दिनकर देसाई, संजय गवस व सुमारे ४०० प्रकल्पग्रस्त ठिय्या आंदोलनास उपस्थित होते. (वार्ताहर)
१९ एप्रिलला जलसमाधीचा इशारा
तिलारी संघर्ष समितीने उद्या बोलाविलेल्या बैठकीत शासनाने वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न निकाली काढला नाही, तर १९ ला जलसमाधीचा इशारा दिला आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे सचिव संजय नाईक यांनी दिली. १७ एप्रिलला गोव्याचे पाणी बंद करण्याचे निवेदन तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार आहोत. पाणी बंद न झाल्यास कालव्यात प्रकल्पग्रस्त उड्या घेऊन जलसमाधी घेतील.