सिंधुदुर्गात अत्याधुनिक भात गिरणी प्रकल्प
By Admin | Updated: June 3, 2015 01:25 IST2015-06-03T01:25:30+5:302015-06-03T01:25:33+5:30
दीपक केसरकर : २० कोटी खर्च अपेक्षित

सिंधुदुर्गात अत्याधुनिक भात गिरणी प्रकल्प
वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातपीक शेतकऱ्यांकरिता २० कोटी खर्चाचा कुडाळ एमआयडीसी येथे अत्याधुनिक भात गिरणी प्रकल्प येत्या एक वर्षात कार्यान्वित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थ व ग्रामविकासमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ग्रामीण कृषी विकास आणि कृषी पर्यटन चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी केसरकर यांनी संवाद साधला. व्हिलेज टुरिझम अंतर्गत तेरेखोल-आरोंदा खाडी, कर्ली कालावल, विजयदुर्ग खाडी यामध्ये वॉटर टुरिझम राबविले जाणार असून, यातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.
परुळे गावाला भारतातील पहिला स्वच्छ गाव म्हणून पुरस्कार मिळाल्याने या गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास साधला जाणार आहे. याचबरोबर आरोंदा, कवठणी, तोंडवळी, हडी, मसुरे, विजयदुर्ग, रामेश्वर-गिर्ये, पडेल येथेही पर्यटन प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. सुमारे ९ कोटी व्हिलेज टुरिझम विकास करण्याकरिता कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या चारही जिल्ह्यांत पर्यटन
प्रकल्प हाती घेतले जाणार
आहे.
इंडो इस्राईल प्रकल्पांतर्गत रोजगार हमी योजना दुसरा टप्पा या कार्यक्रमांतर्गत कृषी खाते व फळ संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून आंबा पिकाला उद्भवणारे फळ गळ, डाग या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्याकरिता केंद्राच्या माध्यमातून प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्याकरिता वेंगुर्लेत प्रायोगिक तत्त्वावर आंबा झाडांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत.
(प्रतिनिधी)
वेंगुर्लेत अत्याधुनिक रुग्णालय
वेंगुर्ले येथे आरोग्याचा प्रश्न सोडविण्याकरिता येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत ५० कॉटचे सुमारे ७ कोटी ५१ लाख खर्चाचे अत्याधुनिक रुग्णालय त्याचबरोबर डायलेसिस सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयाच्या सध्याच्या जुन्या इमारतीत चायनिज रिसर्च सेंटर उभारून त्याला डॉ. द्वारकानाथ कोटणीस असे नामकरण करण्याचा प्रस्ताव आहे. याचबरोबर वेंगुर्लेत मच्छिमारांकरिता व्हिलेज टुरिझम अंतर्गत नवाबाग खाडी येथे सुमारे २ कोटी ३१ लाख खर्चाचे झुलते पूल उभारले जाणार आहे, असे यावेळी स्पष्ट केले.