कुडाळमध्ये राज्यस्तरीय पशुपक्षी पर्यटन मेळा
By Admin | Updated: September 28, 2016 00:43 IST2016-09-27T21:35:21+5:302016-09-28T00:43:59+5:30
एकनाथ नाडकर्णी : ३ ते ६ नोव्हेंबर दरम्यान जिल्हा परिषदेतर्फे आयोजन

कुडाळमध्ये राज्यस्तरीय पशुपक्षी पर्यटन मेळा
कुडाळ : जिल्हा परिषदेच्यावतीने ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत कुडाळ नवीन एस.टी. डेपो येथे राज्यस्तरीय कृषी औद्योगिक पशुपक्षी व पर्यटन मेळा आयोजित केला आहे. जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, दुग्ध व्यावसायिक, पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार यांना कृषी व पशुपालनाविषयी आधुनिक तंत्रज्ञान, विकसित यंत्रसामग्री यांचे ज्ञान मिळावे, तसेच जलव्यवस्थापन व यांत्रिकीकरणाचे महत्त्व कळावे, कृषी व पशुसंवर्धनविषयक व्यवसायासाठी प्रवृत्त करून रोजगार उपलब्ध करून द्यावा, यासाठी या मेळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिली.
या मेळ्याविषयी माहिती देण्यासंदर्भात कुडाळ पंचायत समिती येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी पशुसंवर्धन सभापती एकनाथ नाडकर्णी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई, पंचायत समिती सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती आर. के. सावंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, तसेच कृषी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नाडकर्णी म्हणाले, माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या संकल्पनेतून हा मेळा गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात येत असून, याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या मेळ्यात पशुपक्षी प्रदर्शन, कृषिविषयक, दुग्ध व्यवसाय विषयक प्रशिक्षण, कृषी, दुग्ध व्यवसाय व पर्यटनविषयक स्टॉल असणार आहेत. तसेच या क्षेत्राविषयी विविध तज्ज्ञांची चर्चासत्रे, स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पशुपक्ष्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
रणजित देसाई म्हणाले, हा जिल्हा पर्यटन जिल्हा असून, पर्यटन क्षेत्रातही वाढ झाली पाहिजे, हा उद्देश आमचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा आहे. पर्यटनवाढीसाठी मागील वर्षापासून या मेळ्यात पर्यटन विभागाचाही समावेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर, बीड, उस्मानाबाद तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतून व कर्नाटक, गोवा या राज्यांतूनही या मेळ्यात विविध जातीची संकरित देशी जनावरे आणण्यात येणार आहेत. यावर्षी तांदूळ महोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मेळ्याच्या पहिल्या दिवशी मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन केल्याचे देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कोकणातील मोठे प्रदर्शन : देसाई
हा कृषी, दुग्ध व्यवसाय, तसेच पर्यटनविषयी मेळा आणि प्रदर्शन हे कोकणातील सर्वांत मोठे प्रदर्शन ठरले आहे. या मेळ्याचे उद्घाटन
३ नोव्हेंबरला राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे, असे रणजित देसाई यांनी सांगितले.
प्रदर्शनातील जनावर खरेदीला तत्काळ कर्जमंजुरी
जिल्हा परिषदेच्या सहकार्याने प्रदर्शन कालावधीत खरेदी करण्यात येणाऱ्या जनावरांना तत्काळ कर्ज मंजुरी देण्यात येणार आहे, अशी माहिती रणजित देसाई व एकनाथ नाडकर्णी यांनी दिली.