‘वैभववाडी चषक’ क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
By Admin | Updated: January 2, 2016 08:28 IST2016-01-01T22:01:28+5:302016-01-02T08:28:50+5:30
सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील २४ संघांचा समावेश : उद्या होणार समारोप

‘वैभववाडी चषक’ क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
वैभववाडी : येथील दत्तकृपा प्रतिष्ठान आयोजित सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादित ‘वैभववाडी चषक’ क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला. भाजप जिल्हा सरचिटणीस तथा डोंगरी जिल्हा विकास नियोजन समितीचे सदस्य प्रमोद रावराणे यांच्या हस्ते ‘वैभववाडी चषक’ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचा समारोप रविवारी (दि. ३) मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील २४ नामवंत संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र राणे, नगरसेवक सज्जनराव रावराणे, संतोष माईणकर, रोहन रावराणे, रत्नाकर कदम, दीपक माईणकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर, रणजित तावडे, विवेक रावराणे, सुरेश रावराणे, राकेश कुडतरकर, अमेय पोरे, गजानन पाटील, पंच सुहास चव्हाण, गुरुप्रसाद सुतार, समालोचक अशोक नाईक, अमोल जमदाडे, आदी उपस्थित होते.
उत्तम नियोजन असलेली तालुक्यातील सर्वांत मोठी स्पर्धा म्हणून जिल्ह्यात ओळखल्या जाणाऱ्या ‘वैभववाडी चषक’ क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ४१ हजार ४१ रुपये व द्वितीय पारितोषिक २५ हजार २५ रुपये आणि चषक असे आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस सिंधुदुर्ग रत्नागिरीतील संघांमध्ये अत्यंत चुरशीचे सामने क्रिकेटप्रेमींना पाहता येणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी दुपारी साडेतीन वाजता व त्यानंतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. (प्रतिनिधी)