सिंधुदुर्गनगरी : करूळ घाट वाहतुकीस बंद असल्याने वाहतूक संदर्भात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या घाटातील एकेरी वाहतूक येत्या आठ दिवसांत सुरू करा या मागणीसह विविध प्रश्नांकडे सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.करूळ घाटातील रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ते मंदगतीने सुरू असल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. हा घाट मार्ग येत्या आठ दिवसांत सुरू करा, अशी मागणी करण्यासाठी तसेच घाटाची सुरू असलेले काम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे सोमवारी उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन लक्ष वेधले.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, सतीश सावंत, संदेश पारकर, परशुराम उपरकर यांच्यासह उद्धवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आपण स्वतः या घाट मार्गाच्या रस्त्याची पाहणी करून खात्री करतो, त्यानंतर एकरी वाहतूक सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
वाळू पट्ट्यांचे लिलावाला प्रतिसाद नाहीजिल्ह्यातील वाळू लिलाव, तसेच अवैधरीत्या सुरू असलेली वाळू उत्खनन याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले, असता परवानगी घेऊन वाळू काढताना स्थानिक नागरिक विरोध करतात, मात्र हीच वाळू विनापरवाना काढताना विरोध करीत नाहीत. यामुळे वाळू पट्ट्यांचे लिलाव करताना प्रतिसाद मिळत नसल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.