एस.टी. कामगार संघटनेचे मुंबई आझाद मैदानात 22 मार्च रोजी धरणे आंदोलन
By Admin | Updated: March 15, 2017 20:32 IST2017-03-15T20:15:59+5:302017-03-15T20:32:50+5:30
एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी 22 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन

एस.टी. कामगार संघटनेचे मुंबई आझाद मैदानात 22 मार्च रोजी धरणे आंदोलन
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 15 - एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी 22 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय सचिव दिलीप साटम यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत विविध प्रश्नांची सोडवणूक समयबध्द कालावधीत न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हे आंदोलन करण्यात येणार आहे.
एस.टी. कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा. 1 एफ्रील 2016 पासून 25 टक्के अंतरिम वाढ द्यावी. एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी शासनात विलीन करण्यात यावे. सध्या चालक तसेच वाहक यांच्यावर बाह्य व्यक्तींचे हल्ले होत आहेत. याबाबत वेळीच दखल घेवून परीमाणककारक उपाय योजना करावी. अशा घटना टाळण्यासाठी संबधित गुन्हा अजामीनपात्र गुह्यात समाविष्ट करावा.
ठाणे विभागातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या रद्द कराव्यात. तसेच संघटनेच्या अन्य पदाधिकारी , कर्मचारी यांच्या आकसपूर्ण भावनेतून करलेल्या बदल्या रद्द कराव्यात.
सन 2012-2016 या कामगार करारातील 12 कलमे वगळण्याच्या निर्णयांबाबत 24 एफ्रील 2016 रोजी शासन स्तरावरील बैठकीमध्ये झालेल्या निर्णया प्रमाणे कार्यवाही करावी. प्रत्यक्ष लागणारी धाव वेळ देण्यात यावी. चालक वाहकांची नियमबाह्य कामवाढ रद्द करण्यात यावी.
अपेक्षित उत्पन्न असणाऱ्या व बंद केलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरु कराव्यात. करार, कायदे ,परिपत्रक भंग करून आकसाने घेतलेले निर्णय रद्द करावेत. चालक, वाहकांच्या विश्रांती कक्षात आवश्यक त्या सुविधा द्याव्यात. नवीन आगार निर्माण केल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या कर्मचारी वर्गाला मंजूरी मिळत नाही. त्यामुळे तातडीने कर्मचारीवर्ग मंजूर करण्यात यावा.
वाहकांच्या अपहार प्रकरणी तडजोड व बदलीबाबत प्रसारित करण्यात आलेले परिपत्रक 1/ 2017 व 2/ 2017 रद्द करण्यात यावे. तसेच प्रचलित नियमांचा भंग करून प्रसारित केलेली अन्य परिपत्रके रद्द करण्यात यावीत. चालक कम वाहक या पदामुळे एकाच कामगारावर दोन पदांचा भार येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीला 500 रूपये भरुण वर्षभर मोफत पास देण्यात यावा. उभयपक्षी मान्य असलेली कॅशलेस योजना आणावी. यासह विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्यांच्या पुर्ततेसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही दिलीप साटम यांनी या प्रसिध्दि पत्रकात म्हटले आहे.