रूग्णांच्या आरोग्याशी खेळ

By Admin | Updated: September 13, 2014 23:27 IST2014-09-13T23:27:09+5:302014-09-13T23:27:09+5:30

दोडामार्गातील भयावह स्थिती : वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी

Sports with the health of the patients | रूग्णांच्या आरोग्याशी खेळ

रूग्णांच्या आरोग्याशी खेळ

शिरीष नाईक, कसई दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयामधील प्रभारी डॉ. के. व्ही. राव आजारी असून अन्य तीन डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. ओपीडीसाठी आलेल्या रुग्णांना तासन्तास बसावे लागत आहे. एकप्रकारे रुग्णांची परवड होत आहे.
रुग्णालयातील डॉक्टर आजारी असल्याने पर्यायी दुसरा डॉक्टर द्या, अशी मागणी ओरोस मुख्यालय येथे करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत डॉक्टर देण्यात आला नाही. त्यामुळे आरोग्य अधिकारी रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार रुग्णालयामध्ये घडत आहे. लोकप्रतिनिधींचा दुर्लक्ष याला जबाबदार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयामध्ये वर्ग चारमधील डॉक्टरची चार पदे मंजूर आहेत. त्यापैकी कार्यरत असलेले स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. ए. ए. ऐवले यांच्या वडिलांचे निधन झाल्याने ते रजेवर आहेत. उर्वरित तीन डॉक्टरची पदे रिक्त आहेत. असे असताना तेथील कामकाज चालावे, म्हणून डॉ. राव यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते गेला एक महिना दिवसरात्र ड्युटी करीत आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली असून त्यांनाच हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावे लागले आहे. त्यामुळे दोन दिवस त्यांनी ओपीडी बघण्याचे काम बंद केले. मात्र, गंभीर घटना घडल्यास रुग्णाची गैरसोय होऊ न देता ते तपासणी करतात.
मात्र, याचा परिणाम ओपीडीवर झाला आहे. याबाबतची माहिती ओरोस येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देऊन येथे नवीन डॉक्टर द्या, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. डॉक्टर पाठवतो, असे सांगण्यात येते.
मात्र, डॉक्टर पाठविण्यात आला नाही. त्यामुळे रुग्णालयामध्ये एकही डॉक्टर उपस्थित नाही. रुग्णांची एकाबाजूने भली मोठी रांग लागली होती. केस पेपर काढण्यात आले. मात्र, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसल्याचे न सांगता डॉक्टर येणार आहेत, असे सांगून रुग्णांना ११.३० वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आले. याबाबतची माहिती पत्रकारांना मिळताच हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी हॉस्पिटलमध्ये रुग्ण होते, परंतु डॉक्टर नव्हते, असे आढळून आले.
अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यावेळी फोनाफोनी करण्यात आली. यावेळी एक तासानंतर आजारी असलेले डॉ. राव यांना रुग्णालयात यावे लागले व ओपीडी तपासण्याचे काम करावे लागले.
रूग्णालय असूनही नसल्यासारखे
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निष्काळजी धोरणामुळे दोन दिवस रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे रुग्णांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जबाबदार एकही डॉक्टर येथे नसल्याने रुग्णांना उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णालय असूनही नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे.

Web Title: Sports with the health of the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.