क्रीडा केंद्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By Admin | Updated: February 24, 2015 00:00 IST2015-02-23T22:04:28+5:302015-02-24T00:00:54+5:30

वेंगुर्लेत क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी : समस्या सोडविण्याची मागणी--लोकमत परिचर्चा

The Sports Center ignores the administration | क्रीडा केंद्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

क्रीडा केंद्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रथमेश गुरव - वेंगुर्ले कॅम्प येथे जिल्ह्यातील उत्कृष्ट असे मैदान व क्रीडा केंद्रही आहे. परंतु, या क्रीडा केंद्राची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. एकीकडे मैदानाच्या दुरवस्थेकडे होणारे दुर्लक्ष ही मुख्य समस्या असतानाच या मैदानावर कारणपरत्वे रंगणाऱ्या पार्ट्याही खेळाडूंसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे त्याठिकाणी सराव करणाऱ्या खेळाडूंना याचा त्रास संभवत असल्याने खेळाडू, क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षकांमधून या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वेंगुर्ले तालुका हा जसा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, तसा खेळासाठीही प्रसिद्ध आहे. या भागात क्रिकेटबरोबर कबड्डी, खो- खो, मॅरेथॉन, व्हॉलिबॉल, बीच कबड्डी, रस्सीखेच, कॅरम, वेटलिफ्टिंग यासह विविध खेळ खेळले जातात. येथील खेळाडू गाव किंवा तालुक्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी जिल्हा, राज्य, विभाग, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगले यश मिळविले आहे. वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करून तालुक्यातील खेळाडू मिळवित असलेले हे यश टिकवून ठेवण्यासाठी तालुका क्रीडा समितीकडून काहीही प्रयत्न होताना दिसत नाहीत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव क्रीडा संकुल वेंगुर्लेत आहे. या क्रीडा संकुलाकडे प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष असल्यामुळे याचा फायदा आजही खेळाडूंना मिळत नाही.
वेंगुर्ले कॅम्प येथील या क्रीडा केंद्राच्या विकासासाठी व सुसज्ज क्रीडांगण बनविण्यासाठी एक कोटी रुपये निधी मिळाला असून, तो सध्या पडून आहे. या निधीचा वापर होत नसल्याने तो परत जाण्याची दाट शक्यता आहे. वेेंगुर्ले शहरासह तालुक्यात गुणवंत खेळाडू विविध खेळांमध्ये आपले कौशल्य दाखवित आहेत. परंतु त्यांच्या भविष्यातील वाटचालीस लागणारे सहकार्य मार्गदर्शन व मदत या केंद्राकडून होत नसल्याने क्रीडाप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्राचे कार्यालय नेहमीच बंदावस्थेत
गेल्या दोन वर्षांपासून या केंद्राला कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने कें द्राचे कार्यालय नेहमीच बंद असते. शाळा, महाविद्यालय पातळीवर विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळीच हेरून शासनस्तरावर त्यांना त्या त्या खेळाबाबत तंत्रशुद्ध मार्गदर्शन होणे अपेक्षित असते. तज्ज्ञ शिक्षकांमार्फत खेळाचे मार्गदर्शन मिळाल्यास या तालुक्यातील खेळाडू स्वत:सह तालुक्याचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्यावाचून राहणार नाहीत.
निकृष्ट कामामुळे निधीचा अपव्यय
पाच वर्षांपूर्वी या क्रीडा केंद्राच्या विकासासाठी २५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनविण्यात आले होते. त्या कामाला मंजुरी मिळून काम सुरूही झाले होते. परंतु नेमलेल्या ठेकेदाराने योग्य पद्धतीने काम केले नसल्यामुुळे तो निधी वाया गेल्यासारखाच आहे. त्याच दरम्यान त्या अंदाजपत्रकात दुरुस्ती सूचवून हे अंदाजपत्रक १ कोटी रुपयांचे बनविण्यात आले. यात क्रीडांगणामध्ये दोन व्हॉलिबॉल, दोन कबड्डी, २ खो- खो मैदाने तसेच ४०० मीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी लागणारा ट्रॅक, क्रीडा साहित्य, क्रीडा केंद्राची इमारत दुरुस्ती, आदी कामांचा समावेश आहे. या कामालाही शासनाकडून मंजुरी मिळाली असून, अंदाजपत्रकानुसार १ कोटी रुपये निधी चार वर्षांपूर्वी उपलब्धही झाला आहे. परंतु, त्या निधीचा विनियोग करून हे काम करण्याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत आहेत.
दुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे
वेंगुर्लेतील कॅम्प मैदानाचा क्रि केट व काही ठरावीक खेळ स्पर्धेसाठी स्थानिक खेळाडू वापर करतात. ते सुध्दा येथील गैरसोयींचा सामना करून. नगरपरिषदेच्या अखत्यारित असलेल्या या क्रीडांगणाच्या देखभाल दुरुस्तीकडे नगरपरिषदेबरोबर तालुका क्रीडा समिती यांनीही लक्ष देणे गरजेचे बनले आहे. दरम्यान, या मैदानावर कारणपरत्वे पार्ट्या चालत असतात. पार्ट्या संपल्या, तरी पार्टीसाठी वापरलेल्या बीअरच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास वगैरे मैदानावरच असतात.
येथील जागृती क्रीडा मंडळातर्फे या मैदानावर खेळाडूंसाठी मार्गदर्शक शिबिरे घेतली जातात. या शिबिरात सराव करताना खेळाडूंना या बीअर बाटल्यांचा तसेच तत्सम कचऱ्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मैदान साफ करण्याचे काम जागृती क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी केले आहे.

प्रतिक्रिया
खेळाडूंना योग्य
क्रीडांगणाची आवश्यकता
क्रीडा खात्याच्या अनास्थेमुळे व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले येथील कॅम्प मैदानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे क्रीडा सहित्याबरोबच खेळण्यास योग्य असे मैदान
उपलब्ध होत नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा ही स्थिती खेळाडूंच्या उभारीकरणासाठी मारक ठरणार आहे.
- शलाका गावडे, अ‍ॅथलेटिक्स खेळाडू


तालुका क्रीडा समितीने लक्ष द्यावे
वेंगुर्ले तालुका क्रीडा समितीने या
मैदानाबाबत त्वरित लक्ष घालून खेळाडूंच्या समस्या व त्रुटी तत्काळ दूर कराव्यात. जेणेकरून इथल्या खेळाडूंना विनाअडथळा सराव करता येईल. तसेच राष्ट्रीय स्पर्धा या मैदानावर आयोजित करणे सोयीचे होईल.
- मनीष परब, नगरसेवक, वेंगुर्ले नगरपरिषद


क्रीडा समितीमध्ये सक्रि य
वेंगुर्ले तालुका क्रीडा संकुल समिती नव्याने स्थापन करण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये जास्त शासकीय अधिकाऱ्यांचाच समावेश आहे. अशा समितींमध्ये तालुक्यातील सक्रिय मंडळांचे सदस्य असणेही आवश्यक आहे. तरच या समस्या सुटतील.
- संजय मालवणकर, अध्यक्ष,
जागृती क्रीडा मंडळ, वेंगुर्ले

Web Title: The Sports Center ignores the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.