आंबोली चकाचक मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: September 23, 2014 00:16 IST2014-09-22T22:48:24+5:302014-09-23T00:16:19+5:30
२५0 स्वयंसेवकांचा सहभाग : गोळा केला तब्बल १६0 गोणी कचरा

आंबोली चकाचक मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
आंबोली : आंबोलीत शनिवार ते रविवार या कालावधीत आंबोली चकाचक ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्हाभरातील सुमारे अडिचशे स्वयंसेवकांनी सहभाग दर्शवित आंबोलीतील पंधरा किलोमीटर परिसरातील १६0 गोणी कचरा गोळा केला. पर्यटन स्थळांच्या विकासाबरोबर त्यांच्या देखभालीकडेही लक्ष देणे, गरजेचे असल्याचा संदेश देण्यासाठीच आंबोलीतील नागरिकांनी ही मोहिम राबविली.
आंबोली पर्यटनदृष्ट्या जसजसे नावारुपास येत आहे, तसेच या ठिकाणी वाढणाऱ्या कचऱ्यामुळे बकालही होत आहे. गेली अनेक वर्षे इथल्या पर्यटन स्थळांची कधीच स्वच्छता करण्यात आली नव्हती. परंतु आंबोलीतील काही तरुणांनी एकत्र येऊन मलबार निसर्ग संवर्धन संस्था व होय महाराजा ग्रामीण पर्यटन संस्थेच्या माध्यमातून आंबोलीतील सर्वच्या सर्व पर्यटन स्थळे वर्षभर स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे. या कामी त्यांना हॉटेल ग्रीन व्हॅली, आंबोली पब्लिक स्कूल, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, सिंधुदुर्ग अॅडव्हेंचर क्लब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
आंबोलीत शनिवार, रविवारी महादेव गडपॉर्इंट, शिरगावकर पॉर्इंट, तसेच पूर्वेचा वस मदिर ते मुख्य धबधबा या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. सिंधुदुर्गातील तब्बल अडीचशे स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी ‘आंबोली चकाचक’ ही स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी आंबोलीच्या पंधरा ते सोळा किमीच्या परिसरात तब्बल १६० गोणी भरतील, एवढा प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करण्यात आला व त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
मलबार निसर्ग संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी अशा मोहिमा हाती घेण्यात येतील, असे सांगत संस्थाध्यक्ष काका भिसे यांनी उपस्थित स्वयंसेवक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी आंबोली पब्लिक स्कूलचे प्राचार्य विलास मोरे, सैनिक स्कूलचे प्राचार्य सुरेश गावडे यांचे सहकार्य लाभले. स्वच्छता मोहिमेदरम्यान मुलांना संस्थेमार्फ त कचरा उचलण्याची काठी व हातमोजे पुरविण्यात आले होते. आंबोलीत वेळोवेळी होणाऱ्या समाजोपयोगी कामांमध्ये जिल्ह्यातील कुठल्याही संस्थेला वा व्यक्तीला सहकार्य करायचे असल्यास त्यांनी काका भिसे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थासचिव राजेश केळूसकर यांनी केले आहे. मोहिमेत सहभागी शाळांना विजयकुमार सावंत यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात
आले. (वार्ताहर)