सागरी पर्यटनासाठी स्पीड बोटी सज्ज
By Admin | Updated: December 2, 2014 23:36 IST2014-12-02T22:59:25+5:302014-12-02T23:36:13+5:30
चार वेगवेगळी पॅकेज : देवबाग ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत सफर

सागरी पर्यटनासाठी स्पीड बोटी सज्ज
संदीप बोडवे - मालवण -पर्यटकांना दर्जेदार सागरी पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे तीन आधुनिक स्पीड बोटी उपलब्ध केल्या आहेत. या स्पीड बोटींमधून पर्यटकांना देवबाग संगम ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतच्या समुद्रात मुक्त सागरी सफर करता येणार आहे. यासाठी चार वेगवेगळी पॅकेज असणार आहेत.
जिल्ह्याच्या पर्यटनात किंबहुना देशाच्या पर्यटनात ‘नीलक्रांती’ घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे महत्वाकांक्षी स्कुबा डायव्हिंग सेंटर उभारले आहे. त्याच्याच जोडीला आता समुद्राच्या लाटांमध्ये स्पीड बोटीचा थरार अनुभवण्यासाठी तीन आधुनिक आणि आरामदायी स्पीड बोटी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
अमेरिकन बनावटीच्या या स्पीड बोटींवर केमिकल टॉयलेट आहे. सुरक्षित डेकमुळे पर्यटकांना समुद्राचा थरार अगदी जवळून अनुभवता येणार आहे. या बोटींचा वेग ताशी १५ ते २० सागरी मैल असून २७० अश्वशक्तीचे इंजिन बसविण्यात आले आहे. मनोरंजनासाठी म्युझिक सिस्टिम तसेच सुरक्षिततेची साधने या बोटींवर उपलब्ध असणार आहेत. रस्त्यावरून चालणाऱ्या एखाद्या मर्सिडीज बेन्झप्रमाणेच या बोटी पर्यटकांना समुद्रातही आनंद देण्यास यशस्वी ठरणार आहेत असा विश्वास एमटीडीसीचे साहसी जलक्रीडा व्यवस्थापक सुबोध किनळेकर यांनी व्यक्त केला आहे.
सागरी सफरीची चार पॅकेज
देवबाग संगम, तारकर्ली समुद्र आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासभोवतालच्या समुद्रात वेगवेगळ्या चार प्रकारच्या सफरींद्वारे देशी-विदेशी पर्यटकांना सागरी पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.
यासाठी एमटीडीसीने प्रत्येकी १ तासाची चार विशेष पॅकेज तयार केली आहेत. गेम फिशिंग सफारी, सी फोर्ट सफारी, डॉल्फिन वॉच सफारी आणि सी सफर अशी ही चार पॅकेज असणार आहेत. पर्यटकांना आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या तरच मालवणच्या पर्यटनाचे नाव जगभर होईल असे सुबोध किनळेकर म्हणाले.
स्कुबा डायव्हिंगसाठीही वापर
तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये अत्यंत दर्जेदार असे आंतरराष्ट्रीय निकषांनुसार स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये पोलीस, कस्टम, वनखाते, फायर ब्रिगेड आदी दलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून याचा उपयोग आपत्ती व्यवस्थापनात होणार आहे. हे प्रशिक्षण थेट समुद्रात दिले जाणार असल्याने या स्पीड बोटींचा उपयोग होणार आहे.