जिल्हा रूग्णालयाला विशेष दर्जाची मागणी
By Admin | Updated: November 5, 2014 23:33 IST2014-11-05T22:51:06+5:302014-11-05T23:33:40+5:30
विनायक राऊत यांची माहिती : रूग्णालय सक्षम नसल्याची कबुली

जिल्हा रूग्णालयाला विशेष दर्जाची मागणी
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत. सोयी सुविधा नाहीत. डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांच्या मिळून ३०० पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. आवश्यक मशिनरी बंद आहेत. त्यामुळे रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यास जिल्हा रुग्णालय सक्षम नाही. असे सांगतानाच जिल्हा रुग्णालयाला विशेष दर्जा देण्यात यावा यासाठी मागणी केली असल्याची माहिती बुधवारी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार वैभव नाईक उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयाला भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, जिल्हा रुग्णालयाची बिकट अवस्था सुरु आहे. पर्यटन जिल्ह्याचे रुग्णालय दर्जेदार असले पाहिजे. तेथे दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. मात्र, या रुग्णालयात विविध तज्ज्ञ डॉक्टरांसह अन्य विविध पदे रिक्त आहेत. सुमारे ३०० हून जादा पदे रिक्त आहेत.
देण्यात येणाऱ्या सेवा या कामचलावू आहेत. सन २०१२ पासून जिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅन मशिन बंद आहे. डायलेसीस सेंटरमध्ये सहा मशिन्स आहेत. मात्र, त्यामध्ये सध्या तज्ज्ञ आॅपरेटर नाही. डायलेसीस सेंटरमध्ये एक दोन वेळा रुग्णाचे डायलेसीस केले जाते. त्यानंतर खासगी रुग्णालयात रुग्णांना डायलेसीस करावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयाकडे शववाहिका नाही. अशी जिल्हा रुग्णालयाची बिकट अवस्था पहायला मिळाली. जिल्हा रुग्णालयाचीच प्रकृती सुधारण्याची गरज आहे, असे यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले.
तर पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयाला विशेष दर्जा प्राप्त करून द्या अशी मागणी आपली आहे. सिद्धीविनायक ट्रस्टतर्फे तळेरे येथील रुग्णालयासाठी ५ कोटी रुपये दिले आहेत. मात्र, तत्कालीन पालकमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या भांडणामध्ये जिल्ह्यात चांगली आरोग्यसेवा उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र, जिल्हा रुग्णालयाला विशेष दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. येथील डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच जिल्ह्यात डॉक्टर यावेत यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याप्रमाणे येथे येणाऱ्या डॉक्टरांना विशेष भत्ता मिळावा म्हणून प्रयत्न करणार आहे.
शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यात कुडाळ येथे टेलिमेडिसीन सेंटर येत्या १५ दिवसांत सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी दुर्धर आजारी रुग्णांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्याबाहेरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार केले जाणार आहेत. त्यांना आधुनिक सेवेचा लाभ दिला जाणार आहे तर या सेंटरचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी खासदार राऊत यांनी दिली.
मेडिकल कॉलेज व जात पडताळणी केंद्रासाठी प्रयत्न
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरु व्हावे तसेच जिल्हावासियांची गरज लक्षात घेऊन सिंधुदुर्गनगरीत स्वतंत्र जात पडताळणी केंद्र व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असून याबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून प्राधान्याने मंजुरी घेतली जाईल. डायलेसीस मशिनचे एक आर. ओ. प्लांट बंद असल्याने ज्या रुग्णांना तीन वेळा डायलेसीस द्यावे लागते त्यांना एकदाच दिले जाते. म्हणून शिवसेनेतर्फे आर. ओ. प्लांट जिल्हा रुग्णालयाला देण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, छोटू पारकर तसेच अन्य शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जखमींना दाखला द्या
हत्तीच्या हल्ल्यात अपंगत्व आलेल्यांना अपंगत्वाचा दाखला देण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने यांना देण्यात आल्या आहे. सिंधुदुर्गात १०८ ची सुविधा सक्षम नाही. तिचा जास्तीत जास्त वापर व्हावा व लोकांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी लोकजागृतीची गरज आहे.
- विनायक राऊत, खासदार