‘सी-वर्ल्ड’ला काही ग्रामस्थांचा विरोध
By Admin | Updated: December 2, 2015 00:43 IST2015-12-01T22:28:34+5:302015-12-02T00:43:40+5:30
ग्रामस्थ आक्रमक : आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी

‘सी-वर्ल्ड’ला काही ग्रामस्थांचा विरोध
मालवण : ‘सी-वर्ल्ड’बाबत मुख्यमंत्र्यांसोबत ग्रामस्थांची कोणतीही बैठक झालेली नाही. सी- वर्ल्ड प्रकल्पास जमीन मालकांची सहमती ही केवळ अफवा आहे. प्रकल्पाला विरोध करून निवडणुकीत विजयी झालेल्या आमदार वैभव नाईक यांनी प्रकल्पाबाबत अनुकूलता दर्शविल्यामुळे त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे ग्रामस्थांनी आव्हान देत पाच वर्षांनी निवडणुका होतात, हे लक्षात घेऊन जनमताचा आदर आमदारांनी करावा, अशी आक्रमक भूमिका प्रकल्पविरोधी वायंगणी येथील ग्रामस्थांनी मांडली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रफुल्ल माळकर, उत्तम खांबल, राजेंद्र्र वराडकर, मंगेश आंगणे या ग्रामस्थांनी आपण ग्रामस्थांच्यावतीने भूमिका स्पष्ट करीत असल्याचे सांगितले आहे. आम्हा ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही बैठक झाली नाही. प्रकल्पाला आमचा विरोध कायम आहे.गावचा, जिल्ह्याचा विकास केवळ सी-वर्ल्डमुळे होणार हे चुकीचे आहे. केवळ पर्यटन विकासावर व सुविधांवर गोवा, केरळ मोठा पर्यटन विकास करू शकतात तर सी-वर्ल्ड प्रकल्पच का? असाही सवाल उपस्थित केला. भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी प्रकल्पास जमीन मालकांची सहमती व आमदार वैभव नाईक यांची अनुकूलता या विधानाचा चांगला समाचार घेत आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांसमोर भूमिका स्पष्ट करावी. जे जागा मालक जमीन देण्यास तयार आहेत त्यांनीही समोर यावे, असे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सी-वर्ल्ड प्रकल्प विरोधाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (प्रतिनिधी)