विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्याचे समाधान
By Admin | Updated: December 26, 2014 23:52 IST2014-12-26T22:31:06+5:302014-12-26T23:52:36+5:30
विनोद गोसावी : कुडाळात गोसावी समाजबांधवांचा मेळावा

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्याचे समाधान
चौके : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहून प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गोसावी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांची होणारी वाढ समाधानकारक आणि कौतुकास्पद आहे. त्यामुळे समाज मंडळापुढील आव्हाने वाढली आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाच्या पुढेही नवीन काही करावं लागेल, असे प्रतिपादन नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी केले.
सिंधुदुर्ग नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धन मंडळाचा जिल्हास्तरीय समाजबांधव मेळावा कुडाळ नाथबांधवांच्या उपस्थितीत झाला. या मेळाव्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोसावी बोलत होते.
यावेळी नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गच्या अध्यक्षा उर्मिला गोसावी, उपाध्यक्ष शरद गोसावी, मुंबई मंडळाचे सचिव अमरदीप गोसावी, योगेश गोसावी, भालचंद्र गोसावी आदी उपस्थित होते. विनोद गोसावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
गोसावी म्हणाले, आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव सत्कार झालेल्या गुणवंतांना झाली पाहिजे. संघटित समाज शेवटपर्यंत आपल्या नाथ बांधवांसाठी झगडणारा असला पाहिजे. आपल्या सर्वांना मिळून समस्यामुक्त समाज बनवायचा आहे. त्यासाठी आपापसात समन्वय साधून नाथ बांधवांसाठी आरोग्य शिबिर, व्यवसाय मार्गदर्शन, वधु-वर मेळावा यांसारखे उपक्रम हाती घेतले पाहिजेत. मुंबई मंडळ समाजाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी बांधील आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वत:च्या समाजमंदिराचा संकल्प असून त्यासाठी जिल्ह्यातील नाथबांधवांनी जागा उपलब्ध करून द्यावी. मुंबई मंडळ इमारत निधी जमा करील, असे ते म्हणाले. मंडळाचे उपाध्यक्ष शरद गोसावी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विनोद गोसावी व उर्मिला गोसावी यांच्या हस्ते नाथसमाजातील चाफेखोल येथील आरोग्य पर्यवेक्षक जनार्दन गोसावी, म्हापण येथील संगीत विशारद गिरीश गोसावी, राज्यस्तरीय क्रीडापटू जीवन गोसावी, विठ्ठल गोसावी, रमाकांत गोसावी, अमरनाथ गोसावी, विठ्ठल गोसावी, कृष्णा गोसावी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सन २०१३-१४ मध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये ६० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी, पदविका उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन झिलू गोसावी व प्रास्ताविक भालचंद्र गोसावी यांनी केले. शरद गोसावी यांनी आभार मानले. (वार्ताहर)