दुचाकी नदीपात्रात कोसळून एक ठार
By Admin | Updated: July 21, 2015 00:54 IST2015-07-21T00:54:38+5:302015-07-21T00:54:51+5:30
हिरण्यकेशीजवळ अपघात

दुचाकी नदीपात्रात कोसळून एक ठार
आंबोली : आंबोली-हिरण्यकेशी या तीर्थक्षेत्रावरून पूजा करून परतत असताना गावठणवाडी येथील हनुमंत शिवराम मोहिते (वय ५२) दुचाकीसह पन्नास फूट खोल नदीपात्रात कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अतिवृष्टीने खचलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. या प्रकारामुळे आंबोलीतील निकृष्ट रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐंरणीवर आला आहे. आंबोली आणि परिसरात बांधकाम विभागाच्या बेपर्वाईमुळे आतापर्यंत चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हनुमंत मोहिते हे दर सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हिरण्यकेशी येथील महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात होते. सोमवारी ते पूजा आटोपून साडेसात वाजण्याच्या सुमारास परतत असताना अतिवृष्टीमुळे खचलेल्या रस्त्याचा धुक्यामुळे अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी सुमारे पन्नास फू ट खोल नदीत कोसळली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच मृत झाले.
त्यांच्या पत्नीने आपले पती नऊ वाजले तरी परत आले नसल्याचे पुतण्यांना सांगताच पुतण्यांनी शोधाशोध केली असता त्यांना मोहिते यांचा मृतदेह आढळून आला. मोहिते यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजेंद्र भिसे, कॉन्स्टेबल नितीन उमरसकर करीत असून, अपघाताची माहिती दशरथ मोहिते यांनी पोलिसांना दिली. (वार्ताहर)
हलगर्जीपणाचा चौथा बळी
कावळेशेत येथे पाईपला जाळी बसविण्याची मागणी करूनही जाळी न बसविल्याने यापूर्वी दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुहास नाईक यांचा कठडा नसलेल्या पुलावरून रिक्षा नदीत कोसळून मृत्यू झाला होता. सोमवारी पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊन हनुमंत मोहिते यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे ग्रामस्थांनी बांधकाम विभागावर आपला संताप व्यक्त करीत आहेत.