पत्रादेवी महामार्गावर दुचाकी घसरून एक ठार
By Admin | Updated: May 16, 2016 00:24 IST2016-05-16T00:18:51+5:302016-05-16T00:24:28+5:30
मृत कागलचा : नानेलीतील एकजण गंभीर जखमी

पत्रादेवी महामार्गावर दुचाकी घसरून एक ठार
सावंतवाडी : झाराप-पत्रादेवी महामार्गावरील मळगाव-पिंपळवाडी येथे दोघेजण जखमी अवस्थेत आढळून आले. त्यातील गणपत यशवंत मोरे (वय ४५, रा. करजीवणे, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांचा गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर सिद्धेश कमलाकर धुरी (२८, रा. नानेली, ता. कुडाळ) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी रात्री झाला असला, तरी पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव-पिंपळवाडी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास दोघेजण जखमी अवस्थेत पडले होते, तर या दोघांपासून काही अंतरावर दुचाकी पडली होती. त्यांना तातडीने तेथील ग्रामस्थांनी सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, या दोघांच्याही डोक्याला, तसेच हाताला, पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने गोवा-बांबुळी येथे हलविले.
मात्र, यातील गंभीर जखमी गणपत यशवंत मोरे यांचे उपचार सुरू असताना रविवारी निधन झाले, तर सिद्धेश कमलाकर धुरी अद्याप गंभीर आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे दोघेजण जखमी अवस्थेत आढळून आले. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला, याची माहिती कोणालाही माहीत नाही.
तसेच शनिवारी रात्री दोघेजण जखमी अवस्थेत मिळाल्यानंतर या अपघाताची नोंद रविवारी सकाळी ११ वाजता झाली आहे. याबाबतची माहिती प्रसाद सावंत यांनी पोलिसांना दिली आहे. यातील मृत गणपत मोरे यांचे नातेवाईक रविवारी सकाळी गोवा-बांबुळी येथे पोहोचले असून, पोलिसांनी अपघाताबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली होती. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बापू गवारी करीत आहेत. (प्रतिनिधी)