आनंदाश्रयमध्ये जोपासली सामाजिक बांधीलकी
By Admin | Updated: May 23, 2016 00:25 IST2016-05-22T21:33:55+5:302016-05-23T00:25:06+5:30
नव्या कपड्यांचे वितरण : बबनकाका परब यांना जयप्रकाश गोसावी ट्रस्टचा ‘सिंधुरत्न पुरस्कार’

आनंदाश्रयमध्ये जोपासली सामाजिक बांधीलकी
चौके : जयप्रकाश गोसावी सेवा संस्था बोर्डवेचे अध्यक्ष जयप्रकाश गोसावी आणि त्यांच्या पत्नी नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवेच्या अध्यक्षा तसेच आश्रमशाळा बोर्डवेच्या संचालिका उर्मिला जयप्रकाश गोसावी यांनी आपल्या लग्नाचा २७ वा वाढदिवस अणाव दाभाचीवाडी येथील बबनकाका परब यांच्या जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रयमधील निराधार वृद्धांसोबत साजरा करून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न केला.
आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गोसावी पती-पत्नीनी सर्व निराधार वृद्धांना दुपारचे भोजन आणि सर्वांना नवीन कपड्यांचे वाटप केले. तत्पूर्वी, जयप्रकाश गोसावी सेवा संस्था बोर्डवेच्यावतीने आनंदाश्रयचे संस्थापक बबनकाका परब यांचा ‘सिंधुरत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जयप्रकाश गोसावी, उर्मिला गोसावी, बोर्डवेचे उपसरपंच शामसुंदर मोडक, माजी सरपंच गजानन शिंदे, दिलीप तावडे, प्रदीप पालव, शंकर घाडी, विजय गोसावी, नंदकुमार गोसावी, प्रकाश सावंत, सुंदर साळवी, आनंदाश्रयचे विश्वस्त आप्पा भिसे आदी उपस्थित होते.
निराधार वृद्धांसमोर आश्रमशाळेतील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्यांचेमनोरंजन केले व त्यांना नातवंडांच्या सहवासाची अनुभूती घडविली.
यावेळी मार्गदर्शन करताना आनंदाश्रयचे संस्थापक बबनकाका परब यांनी सांगितले की, जयप्रकाश गोसावी आणि उर्मिला गोसावी यांनी आपला आनंद निराधारांसोबत वाटून घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद. हा वृद्धाश्रम नसून सेवाश्रम आहे. आम्ही फक्त मुले नसलेल्या निराधारांनाच याठिकाणी दाखल करून घेतो. वृद्धाश्रम ही कौतुकाची बाब नाही. आता समाजाला या समस्येची जाणीव होतेय आणि ही जाणीवच ही समस्या कमी करेल. सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ज्येष्ठांची परवड झाली आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे. तुमच्यासारख्या अनेकांमार्फत देवाने हे माझ्याकडून घडवून आणले आहे.
यावेळी उर्मिला गोसावी यांनी सांगितले की, समाजातील ही समस्या दूर करण्यासाठी समाजातील तरुण मंडळींना जागृत करण्याचे काम आम्ही करू. प्रत्येक पालकांच्या मुलांनी त्यांचे कर्तव्य योग्य रितीने पार पाडल्यास वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही. (वार्ताहर)