स्नेहा कासार, निकिता सुतार प्रथम
By Admin | Updated: January 1, 2015 00:16 IST2014-12-31T21:02:20+5:302015-01-01T00:16:10+5:30
स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धा : राज्यस्तरीय स्पर्धेत करणार सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व

स्नेहा कासार, निकिता सुतार प्रथम
सिंधुदुर्गनगरी : जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ गटात सावंतवाडीच्या स्नेहा सुरेश कासार हिने, तर कनिष्ठ गटात कणकवलीच्या निकिता प्रदीप सुतार यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे दोघेही राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
प्रत्येकाने नियोजन करून चालत रहावे, राजमार्ग आपोआप मिळत जातो. हा देश युवकांच्या हातात आहे. जर युवक स्वच्छतेबाबत जागरूक झाले तर स्वच्छ भारताचे स्वप्न दूर नाही, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले. ते जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, सावंत, कसालकर, मंगेश मराठे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक नीलेश मठकर, संतोष कटबू, इंदिरा परब, संदीप पवार, आदी उपस्थित होते.
पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत दरवर्षी देशात लोकचळवळ निर्माण व्हावी, लोकसहभागातून निर्णय प्रक्रिया उभी राहावी या हेतूने २ आॅक्टोबर ते १२ जानेवारी या कालावधीत स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ठ गटांत घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत वरिष्ठ गटात स्नेहा कासार यांनी प्रथम, वेंगुर्ला येथील समृद्धी पेडणेकर द्वितीय, तर कुडाळ येथील कल्पना ठुबरे व सावंतवाडी येथील गीतांजली पेडणेकर यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला आहे, तर कनिष्ठ गटात कणकवलीच्या निकिता सुतार हिने प्रथम, कुडाळच्या जागृती राणे हिने द्वितीय, तर सावंतवाडीच्या नेहा प्रभू यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. (प्रतिनिधी)
विजेत्यांचा गौरव होणार
स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेतील विजेत्या दोन्ही गटांतील स्पर्धकांना प्रथम क्रमांकास रुपये ११ हजार, द्वितीय क्रमांकास रुपये ७ हजार, तर तृतीय क्रमांकास रुपये पाच हजारांचे रोख पारितोषिक नजीकच्या होणाऱ्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर यांनी दिली.