शिरगावमध्ये सांगाडा आढळला
By Admin | Updated: July 28, 2014 23:21 IST2014-07-28T22:34:47+5:302014-07-28T23:21:52+5:30
गावात एकच खळबळ

शिरगावमध्ये सांगाडा आढळला
शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगांव गावठण येथील नितीन तावडे यांच्या बंद घराच्या शौचालयाच्या टाकीत पोलिसांना हाडांचा सांगाडा सापडल्याने शिरगांव गावात एकच खळबळ उडाली असून तो हाडांचा सांगाडा कोणाचा? तेथे कोणी व कशासाठी टाकला याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे. देवगड-नांदगांव मार्गावर शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर नितीन नारायण तावडे यांचे घर आहे. सद्यस्थितीत हे घर बंद असून नितीन तावडे हे व्यवसायानिमित्त कणकवली येथे असतात. दुपारी ३ च्या सुमारास देवगड पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी शिरगावला फौजफाट्यासह भेट देत त्यांना मिळालेल्या माहितीनुसार नितीन तावडे यांच्या घराशेजारी असलेल्या सुमारे ७ ते ८ फूट शौचालयाच्या टाकीत हाडे सापडली आहेत. याबाबत सायंकाळी ४.३० वाजता घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
यावेळी शिरगावचे तलाठी मधुकर बांदेकर, तळेबाजार तलाठी किरण गावडे, नायब तहसीलदार ए. जी. शेळके, शिरगांव पोलीस दूरक्षेत्र अंमलदार दीपक वरवडेकर, सुरेश पाटील, राजन पाटील, पोलीस पाटील चंद्रशेखर साटम उपस्थित होते.
नितीन तावडे यांच्या घराशेजारील शौचालयाच्या टाकीत सापडलेली हाडे कोणाची? कोणाचा घातपात झाला का? मृतदेह जर टाकीत होता तर आजूबाजूच्या घरांना कुजण्याचा वास त्यावेळी कसा नाही आला? हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत. सापडलेल्या हाडांच्या डीएनए चाचणीवरूनच मृतदेह स्त्री की पुरुष? घातपात की खून? हे उघड होणार आहे. घटनास्थळी डीवायएसपी विजय खरात यांनी भेट दिली व वस्तुस्थितीची पाहणी केली.
देवगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद बोडके यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास नकार दिला. घटनेचा तपास शीघ्रगतीने सुरु आहे. तपास पूर्ण झाल्यावर माहिती देणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)