समुद्रात बुडून सहा मुलींचा मृत्यू

By Admin | Updated: September 27, 2015 00:37 IST2015-09-27T00:23:40+5:302015-09-27T00:37:58+5:30

गुहागर, देवबागमधील दुर्घटना : मृत मुंबई, चिपळूण व बेळगावच्या

Six girls die drowning in the sea | समुद्रात बुडून सहा मुलींचा मृत्यू

समुद्रात बुडून सहा मुलींचा मृत्यू

गुहागर / मालवण : सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या सहा मुलींचा शनिवारी गुहागर आणि देवबाग येथे बुडून मृत्यू झाला. गुहागरमध्ये बुडालेल्यांपैकी चार मुलींचे मृतदेह सापडले. अन्य तीनजण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. देवबाग येथे समुद्रात पोहण्याचा आनंद लुटणाऱ्या बेळगाव येथील मुल्ला कुटुंबीयांतील दोन मुलींचा शनिवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाला.
मुंबईहून गुहागरला फिरण्यासाठी म्हणून आलेल्या शेख आणि चांदा कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. गुहागर समुद्रकिनारी शनिवारी दुपारी पोहण्यासाठी म्हणून गेलेले सातजण पाण्यामध्ये बुडाले. सायंकाळी उशिरापर्यंत यापैकी चार मुलींचे मृतदेह मिळाले आहेत.
शेख जोया बदरुद्दीन (९), शेख सुफियाना (१७) मारिया चांदा (१४) हीना चांदा (२१) अशी मृत चौघींची नावे आहेत. तर शेख बदरुद्दीन युसूफ अल्ला (वय ४६), त्यांची मुले शेख शहाबाझ बदरुद्दीन (१८), शेख महम्मद कादीर बदरुद्दीन (१६) हे तिघे बेपत्ता आहेत. पोहण्यासाठी गेलेल्या सातजणांमध्ये शेख बदरुद्दिन हे एकटेच मोठे आहेत.
मुंबई चेंबूर येथून शेख कुटुंबीय गोवळकोट येथे राहणारे साडू आणि चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयातील प्राध्यापक मोहम्मद शफी रज्जाक चांदा यांच्याकडे सुटीनिमित्त आले होते. सुटीचा आनंद घेण्यासाठी म्हणून शेख कुटुंबातील सहाजण आणि चांदा कुटुंबातील पाचजण असे अकराजण गुहागरला फिरायला गेले. दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान ते गुहागर समुद्रकिनारी पोहण्यासाठी म्हणून गेले.
शेख बदरुद्दीन युसूफ अल्ला , त्यांची मुले शेख शहाबाझ बदरुद्दीन , शेख महम्मद कादीर बदरुद्दीन , शेख जोया बदरुद्दीन , शेख सुफियाना तसेच चांदा कुटुंबातील मारिया चांदा व हीना चांदा हे सातजण पोहण्यासाठी म्हणून समुद्रात उतरले होते.
हे सातजण पोहायला गेले तेंव्हा मोहम्मद चांदा, त्यांची पत्नी रिझवाना, मोठी मुलगी शिफा आणि शेख बदरुद्दिन युसूफ अल्ला यांची पत्नी आफरीन असे चारजण त्यावेळी किनाऱ्यावरील नाना-नानी पार्क येथे जेवण करीत होते. जेवण झाल्यानंतर मोहम्मद चांदा हे समुद्रकिनारी गेले असता जेटी शेजारी त्यांची लहान मुलगी मारिया चांदा (१४) ही पाण्यातच बेशुद्ध पडली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गुहागर पोलीस ठाण्यासी संपर्क साधून मारियाला गुहागर ग्रामीण रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश ढेरे यांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
दरम्यान, पोहण्यासाठी गेलेले उर्वरित सहाजण कोठेच दिसत नसल्याचे चांदा यांनी पोलिसांना सांगितले. यानंतर शोधाशोध सुरु झाली. पर्यटक बुडाल्याची बातमी समजताच नगराध्यक्ष जयदेव मोरे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी पोलीस यंत्रणेसह ग्रामस्थांनीही नक्की घटना काय घडली, याची माहिती घेण्यासाठी समुद्रकिनारी धाव घेतली. गुहागरमधील नागरिकांनीही तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत यापैकी चार मुलींचे मृतदेह मिळाले आहेत. रात्री उशिरापर्यंत शोधमोहिम सुरु होती. (प्रतिनिधी)
आता तरी पती, मुलं बाहेर येतील...
ही घटना समजताच चांदा कुटुंबीयांचे नातेवाईक गुहागर समुद्र किनारी दाखल झाले. त्यांनी चांदा व शेख कुटुंबीयाना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शिफा चांदा व शेख बदरुद्दीन युसूफ अल्ला यांची पत्नी आफरीनने अक्षरश: टाहो फोडला होता.
पतीसह चार मुले एकाचवेळी गमावल्याने त्यांना दु:ख आवरता येत नव्हते. थोड्या वेळाने तरी आपला पती व मुले पाण्याबाहेर येतील या आशेने समुद्रकिनारी सुरुबनात बसून समुद्राकडे नजर लावून रडत होत्या.
२00३ नंतरची मोठी दुर्घटना
२00३ साली पुण्यातील तार्दाळकर कुटुंबातील सहाजण गुहागर समुद्रात बुडून मरण पावले होते. त्यानंतरची ही सर्वांत मोठी दुर्घटना आहे. गुहागरचा समुद्रकिनारा धोकादायक नाही. तरीही घडलेल्या या दुर्घटनेमुळे गुहागरवर शोककळा पसरली आहे.
चौघांचे मृतदेह सापडले
सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चार मुलींचे मृतदेह हाती आले. सर्वांत आधी मारिया हिचा मृतदेह सापडला. किंबहुना ती सापडल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे प्रा. चांदा यांच्या लक्षात आले. त्यानंतर प्रशासन आणि नागरिकांनी केलेल्या तपासणीमध्ये शेख जोया, शेख सुफियाना आणि मारियाची सख्खी बहीण हीना यांचे मृतदेह हाती लागले.

Web Title: Six girls die drowning in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.