सहा सभापती कॉँग्रेसचे
By Admin | Updated: September 15, 2014 00:08 IST2014-09-14T23:12:36+5:302014-09-15T00:08:06+5:30
दोडामार्ग, वेंगुर्लेत बाचाबाची : दोडामार्गात भाजप, वेंगुर्लेत केसरकर गटाचा सभापती

सहा सभापती कॉँग्रेसचे
कणकवली : आठपैकी सहा पंचायत समित्यांच्या सभापतिपदी कॉँग्रेसचे सदस्य विराजमान झाले. नाट्यपूर्ण घडामोडीत दोडामार्गात भाजपचा सभापती निवडला गेला. काल, शनिवारी रात्री दोडामार्गात झालेल्या पक्षबदलाने सभापती निवडीवेळी राडा झाला. सावंतवाडीत काढण्यात आलेला ‘ड्रॉ’ कॉँग्रेसला ‘लकी’ ठरला, तर वेंगुर्लेत केसरकर गटाला कौल मिळाला. दरम्यान, वेंगुर्लेतही निवडीदरम्यान सदस्य, कार्यकर्त्यांत शाब्दिक बाचाबाची झाली.
कणकवली पंचायत समिती सभापतिपदी आस्था सर्पे, तर उपसभापतिपदी भिवा वर्देकर यांची बिनविरोध निवड झाली. वैभववाडीच्या सभापतिपदी वैशाली रावराणे, उपसभापतिपदी शोभा पांचाळ, मालवणच्या सभापतिपदी सीमा परुळेकर, तर उपसभापतिपदी देवानंद चिंदरकर यांची निवड झाली. सावंतवाडी सभापतिपदी कॉँग्रेसचे प्रमोद सावंत, तर उपसभापतिपदी महेश सारंग यांना लॉटरी लागली. दोडामार्गात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले महेश गवस यांची सभापतिपदी, तर उपसभापती म्हणून आनंद रेडकर बिनविरोध निवडून आले. कुडाळमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा घावनळकर यांची सभापतिपदी, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे रामचंद्र ऊर्फ आर. के. सावंत यांची निवड करण्यात आली. देवगडमध्ये कॉँग्रेसच्या डॉ. मनोज सारंग यांची सभापतिपदी, तर स्मिता राणे यांची उपसभापतिपदी निवड झाली.
दोडामार्गात राडा
दोडामार्गात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष बाळा गावडे यांच्यासह चौघांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. काल, शनिवारीच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले महेश गवस यांची सभापतिपदी, तर उपसभापती म्हणून आनंद रेडकर यांची बिनविरोध निवड झाली. नाराज शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. कुडाळमध्ये राष्ट्रवादीने कॉँग्रेसशी हातमिळवणी केली असल्याने निवडणुकीवर शिवसेनेच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला.
सावंतवाडी, वेंगुर्लेत चिठ्ठी
सावंतवाडी पंचायत समितीत कॉँग्रेस आणि शिवसेनेचे समसमान संख्याबळ झाल्याने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. कॉँग्रेस सभापती व उपसभापती पदांच्या चिठ्ठीत दोन्ही वेळा लकी ठरले.
वेंगुर्लेतील निवडीत टाकण्यात आलेल्या चिठ्ठ्यांमध्ये दीपक केसरकर गटाच्या सुचिता वजराठकर यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे स्वप्निल चमणकर यांची उपसभापतिपदी निवड झाली. दोन्ही गटांतील बलाबल समान झाल्याने चिठ्ठी टाकण्यात आली. निवडीनंतर काही वेळातच पंचायत समितीसमोर दोन्ही गटांत शाब्दिक खडाजंगी झाली. (प्रतिनिधी)