सिंधुदुर्गची लोकसंख्या सर्वांत कमी
By Admin | Updated: July 10, 2015 22:02 IST2015-07-10T22:02:20+5:302015-07-10T22:02:20+5:30
कुटुंब नियोजनामुळे घट : जिल्ह्यातील जनतेचे रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर स्थलांतर

सिंधुदुर्गची लोकसंख्या सर्वांत कमी
रजनीकांत कदम -कुडाळ -सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या कमी झाली असून, ती कमी होण्याच्या कुटुंब नियोजनाच्या कारणाबरोबरच जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जनता रोजगारासाठी स्थलांतर होत आहे, हेही लोकसंख्या कमी होण्याचे प्रमुख कारण असल्याचे मत जाणकार व शासनाचे अधिकारी यांचे आहे. निसर्गसंपन्न, साक्षरता, विविध क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्तींची खाण असलेला व देशातील पहिला पर्यटन जिल्हा अशी अनेक बिरूदावली मिरविणारा हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून २०११च्या जनगणनेनुसार ठरल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब भूषणावह या जनगणनेनुसार भारतात जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यात महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक लागत आहे. राज्याची लोकसंख्या ११ कोटी २४ लाखांच्या वर पोहोचली असून, ती सुमारे १६ टक्केच्या सरासरीने वाढतच आहे. राज्यात सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. वरील २००१ व २०११ च्या आकडेवारी वरून असे लक्षात येते की, जिल्ह्याची लोकसंख्या वाढलेली नसून ती कमी झाली आहे. ही लोकसंख्या कमी होण्याची टक्केवारी ही वजा २.३० टक्के एवढी आहे.
कामगार न मिळाल्याने एमआयडीसीतील काही कंपन्या बंद झाल्या आहेत. लघुउद्योग, कारखाने सुरू करून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. शासनाच्या सर्व योजनांना येथील जनता भरभरून प्रतिसाद देते, असे असतानाही कमी लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यातील जनतेला प्रशासन सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरताना दिसत आहे.
भूषणावह असले तरी विचार करा
एकीकडे जगासमोर वाढत्या लोकसंख्येच्या भस्मासूराचे संकट आ वासून उभे असताना जिल्ह्याची लोकसंख्या कमी असणे हे भूषणावह असले तरी लोकसंख्या का कमी होत आहे, याचा विचार करणेही गरजेचे आहे. शासनाच्या निष्कर्षानुसार जिल्ह्यातील सुशिक्षित जनता ही रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात आहे. हे जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बाब आहे. कारण काही गावांमध्ये ज्येष्ठच मंडळी आढळतात.
लोकसंख्या कमी होण्यामागची कारणे
सुशिक्षितांचा जिल्हा, स्त्री-पुरुष समानता मानली जाते, कुटुंब नियोजनाचे पालन, लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम माहीत आहेत, जनजागृतीबाबत अनेक कार्यक्रमांचे आयोजन गावागावांत असते. एक किंवा दोन मुलांवर समाधान मानने, रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर स्थलांतर अशी विविध कारणे आहेत.
विद्यार्थ्याविना शाळा पडताहेत ओस
आपली मुले चांगले शिक्षण घ्यावीत, याकरिता बहुतांश पालक हे मुलांना खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवितात. यामुळे जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांमधील पटसंख्या घटत असताना कमी जनन दर असल्याने मुले कमी प्रमाणात आढळल्याने सरकारी शाळा विद्यार्थ्याविना ओस पडत आहेत.
या जिल्ह्यात रोजगाराच्या संधी कमी असल्याने येथील मोठ्या प्रमाणात जनताही रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन तिथेच राहत असल्याने जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण कमी असण्यामागे रोजगारासाठी स्थलांतर हे महत्त्वाचे कारण आहे, असे मत जिल्हा सांख्यिकी विभागाचे अधिकारी मसगे यांनी व्यक्त केले.
स्त्रियांचे प्रमाण जास्त
मुलींचे कमी होणारे प्रमाण पाहता सगळीकडे ‘बेटी बचाव, राष्ट्र बचाव’ मोहीम सुरू आहे. जिल्ह्यातील पुरुष व महिला यांच्या लोकसंख्येची आकडेवारी पाहता हे चिभ येथे वेगळे असून, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जास्त आहे. सरासरी १000 पुरुषांच्या मागे १0३७ स्त्रिया एवढे प्रमाण आहे.