सिंधुदुर्गात बाजी कोणाची ?
By Admin | Updated: October 19, 2014 00:25 IST2014-10-19T00:23:27+5:302014-10-19T00:25:30+5:30
उत्सुकता शिगेला : कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीकडे राज्याचे लक्ष

सिंधुदुर्गात बाजी कोणाची ?
सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या, रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तीन ते चार तासांत सर्व निकाल लागणार असून दुपारपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांवर कोण बाजी मारणार ते स्पष्ट होणार आहे.
सातव्यांदा निवडणुकीत असलेल्या आणि काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांच्या कुडाळमधील लढतीकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी राणे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या निकालावर जिल्ह्यातील आगामी राजकारणाची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. उद्या सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व ठिकाणाचे निकाल हाती येतील, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणूक मतमोजणीची सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असून, निवडणूक लढविलेल्या एकूण २४ उमेदवारांतून विजयी तीन उमेदवार कोण? हा फैसला उद्या, रविवारी होणार आहे. त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे, तर मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
विजयी होणारे उमेदवार कोण? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यासाठी उद्या, रविवारी कणकवली, सावंतवाडी व सिंधुदुर्गनगरी येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
मतमोजणीच्या तिन्ही ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीवेळी होणारी पक्षीय कार्यकर्त्यांची गर्दी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. जिल्ह्याबाहेरील पोलीस बळाची मदत घेण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी १५ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)