सिंधुदुर्गनगरी : सभापती निवड बिनविरोध
By Admin | Updated: November 5, 2014 23:31 IST2014-11-05T22:49:59+5:302014-11-05T23:31:25+5:30
जिल्हा परिषद : स्नेहलता चोरगे, अंकुश जाधव, संजय बोंबडी, गुरूनाथ पेडणेकरांना संधी

सिंधुदुर्गनगरी : सभापती निवड बिनविरोध
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी स्नेहलता चोरगे, समाजकल्याण सभापतीपदी अंकुश जाधव यांची तर विषय समिती सभापतीपदी संजय बोंबडी व गुरुनाथ पेडणेकर यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली.
जिल्हा परिषद सभापतीपदांचा अडीच वर्षाचा कार्यकाल १ आॅक्टोबर रोजी समाप्त झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने २ आॅक्टोबर रोजी या पदांच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून खास बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, त्यावेळी एकाही पदासाठी सदस्यांकडून नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्याने ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी लागली होती. त्यानंतर या सर्व पदांचा कार्यभार जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्याकडेच होता. बुधवारी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडीसाठी खास बैठकीचे आयोजन केले होते. या पदांमध्ये महिला व बालकल्याण सभापती पदासाठी स्नेहलता चोरगे यांनी नामनिर्देशन भरले होते तर समाजकल्याण सभापतीपदासाठी अंकुश जाधव यांनी नामनिर्देशन भरले होते तर विषय समिती सभापतींच्या दोन जागांसाठी गुरुनाथ पेडणेकर आणि संजय बोंबडी यांनी नामनिर्देशनपत्र भरले होते. या सर्वांचे अर्ज वैध ठरल्याने आणि प्रतिस्पर्धी अन्य कोणी सदस्यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल न केल्याने पिठासन अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी महिला व बालकल्याण सभापतीपदी स्नेहलता चोरगे यांची, समाजकल्याण सभापतीपदी अंकुश जाधव यांची तर विषय समिती सभापतीपदी संजय बोंबडी आणि गुरुनाथ पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
आजच्या सभापती निवडीच्या बैठकीला जिल्हा परिषदेचे सर्व सत्ताधारी सदस्य तसेच विरोधी गटाचेही सर्व सदस्यांनी उपस्थिती दर्शविली होती. प्रशासनाच्यावतीने सर्व नवनिर्वाचित सभापतींना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
वैभववाडी, देवगड, सावंतवाडी, दोडामार्गला झुकते माप
आजच्या जिल्हा परिषद सभापती निवडीत वैभववाडी, देवगड, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांना झुकते माप देण्यात आले आहे. स्नेहलता चोरगे (वैभववाडी), गुरुनाथ पेडणेकर (सावंतवाडी), संजय बोंबडी (देवगड) तर अंकुश जाधव (दोडामार्ग) यांची निवड झाली आहे. अंकुश जाधव यांची समाजकल्याण सभापतीपदासाठी पुन्हा निवड झाली आहे. सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्यांमध्ये अनुसूचित जातीचे एकमेव सदस्य असल्याने त्यांची निवड अपेक्षितच होती. मात्र आजच्या सभापती निवडीमध्ये उत्साह दिसून आलेला नाही. प्रत्येक निवडीत ढोल, फटाके यांची आतषबाजी होते. आजची निवड मात्र अतिशय शांततेत आणि निरुत्साही वातावरणात झाल्याचे दिसून येत होते.