सिंधुदुर्ग राज्यात अव्वल बनविणार
By Admin | Updated: August 21, 2016 22:50 IST2016-08-21T22:50:08+5:302016-08-21T22:50:08+5:30
रवींद्र चव्हाण : शहरातील प्रभाग चार कार्यालयाचे उद्घाटन; भाजप टीमचे केले विशेष कौतुक

सिंधुदुर्ग राज्यात अव्वल बनविणार
मालवण : पालिकांचे बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मालवण शहरातील प्रभाग चार येथे भाजपच्या प्रभाग कार्यालयाचे उद्घाटन बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पालिका निवडणुकीच्या विजयाचे हे कार्यालय पहिले पाऊल आहे. शहरातील विकासासाठी शतप्रतिशत भाजप होणे आवश्यक आहे. राज्याला भाजपच्या रूपाने गतिमान सरकार लाभल्याने मालवणसह सिंधुदुर्ग राज्यात एक नंबरचा जिल्हा बनविणार, अशी ग्वाही चव्हाण यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.
दरम्यान, प्रभाग चारचे अध्यक्ष गणेश कुशे तसेच तालुक्यातील भाजपच्या टीमचे चव्हाण यांनी कौतुक करताना पालिकेवर भाजपाचा झेंडा निश्चितच फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजपच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली जात आहे.
मालवण येथील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून अपेक्षित विकास भाजपच्या माध्यमातून साकारला जाईल, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, विलास हडकर, महेश मांजरेकर, भाऊ सामंत, आप्पा लुडबे, गोपी पालव, जयदेव कदम, आबा कोंडुसकर, विजू केनवडेकर, विनोद भोगावकर, पूर्वा ठाकूर, पूजा सरकारे, गजानन ठाकूर, बबन परुळेकर तसेच विलास सामंत, दादा कांदळकर, महेश जावकर, भाई कासवकर, आदी तसेच मेढा भागातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एक हजार नागरिकांना विमा सुरक्षा
भाजप प्रभाग चारच्यावतीने शहरातील एक हजार नागरिकांना दोन लाख रुपये किमतीचा मोफत अपघाती विमा सुरक्षा देण्यात आला आहे. याबाबतही मंत्री चव्हाण यांनी गणेश कुशे यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते विमा सुरक्षा पत्र वितरीत करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती देताना त्याचे थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत, अशी माहिती प्रभाग अध्यक्ष गणेश कुशे यांनी दिली. यावेळी कुशे यांच्या हस्ते मंत्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.