गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गवासीय सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:17 IST2017-08-23T23:17:07+5:302017-08-23T23:17:07+5:30

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गवासीय सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : सर्वत्र धुमधडाक्यात साजरा होणारा गणेश चतुर्थीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असून, जिल्ह्यात मंगलमय असे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुुुदुर्गात उद्या, शुक्रवारी ६७ हजार ७४८ घरगुती गणपती, तर ३५ सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव हा उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गवासीय सज्ज झाले आहेत.
दरम्यान, गेले दोन दिवस मुंबईकर (चाकरमानी) रेल्वे, एस. टी. महामंडळाच्या जादा गाड्या, लक्झरी बसेस आणि खासगी वाहनांमधून दाखल होत आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
कोकणपट्ट्यात या सणाला मोठी धामधूम असते. प्रत्येकाच्या घरी श्रींची मूर्ती विराजमान होते. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच बाजारपेठा, वाद्यांची दुकाने, गणेशमूर्ती शाळा, भजनांची तालीम यामुळे परिसरात अक्षरश: भक्तिमय वातावरण निर्माण होते. कामानिमित्त मुंबई, पुणे, गोवा येथे वास्तव्यास राहणारे चाकरमानी गणेशोत्सवास आपल्या गावी येतात. कित्येक दिवसांपासून बंद असणारी घरे यानिमित्ताने उघडली जातात.
वैद्यकीय पथके तैनात
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी २१ ठिकाणी फिक्स पॉर्इंट निश्चित करण्यात आले आहेत. सहा ठिकाणी चारचाकीद्वारे पेट्रोलिंग, तर सात ठिकाणी दुचाकीच्या माध्यमातून पेट्रोलिंग केले जाणार आहे. ठिकठिकाणी वैद्यकीय पथके तैनात ठेवली जाणार आहेत.