सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताला पोलीस बळ द्या
By Admin | Updated: September 15, 2014 23:21 IST2014-09-15T21:53:23+5:302014-09-15T23:21:06+5:30
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस विभागाची मागणी

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताला पोलीस बळ द्या
सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल अलर्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नवीन गाड्यांसह गोवा बनावटीची दारु, रोकड यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. यासाठी २१ ठिकाणी तपासणी नाकी कार्यरत ठेवली आहेत तर आणखी सहा ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात येणार आहेत. निवडणूक बंदोबस्तासाठी जिल्ह्याबाहेरील (पाच कंपन्या) ६०० पोलिसांचे अतिरिक्त बळ मिळावे अशी मागणी जिल्हा पोलीस विभागाने केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ई. रविंद्रन व अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस बळ मागविण्यात आले आहे. पाच कंपन्या आणि सहाशे पोलीस कर्मचारी मागविण्यात आली आहे. मंगळवारी पोलीस महासंचालकांची बैठक होत असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासह संवेदनशील केंद्राची निश्चिती होणार असल्याची माहिती विनिता साहू यांनी यावेळी दिली. लोकसभा निवडणूक कालावधीत दाखल झालेल्या नवीन बोलेरो गाड्यांच्या पार्श्वभूमीवर या विधानसभा निवडणूक कालावधीतही जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नवीन गाड्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच गोवा बनावटीची अवैध दारु, रोख रक्कम यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
निवडणूक बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस बळाच्या मदतीला जिल्ह्याबाहेरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. ६०० पोलीस मागविण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी दिली.कुडाळ मतदारसंघाची मतमोजणी सामाजिक न्याय भवन येथे होणार आहे. त्याबाबतची निश्चिती करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. संभाव्य उमेदवार व पक्षीय खर्चावरही प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. निवडणुकीसाठी वाहने फिरविण्यासाठी उमेदवार अथवा पक्षाला जिल्हास्तरावरून परवानगी मिळणार आहे. पक्षाच्या बैठका, प्रचारसभा, रॅली यावरही प्रशासनाची नजर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)