सिंधुदुर्ग विकसितांच्या यादीत
By Admin | Updated: October 12, 2014 01:01 IST2014-10-12T00:59:10+5:302014-10-12T01:01:07+5:30
नारायण राणे : विरोधकांना मते मागण्याचा अधिकार नसल्याचा दावा

सिंधुदुर्ग विकसितांच्या यादीत
कुडाळ : गेल्या २५ वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील विकसित जिल्ह्यांच्या यादीत आलेला आहे. येथील विरोधकांनी केवळ माझ्यावर टीका करण्याचे काम केले आहे. त्यांना विकासाला साथ दिली असती तर जिल्हा आणखी पुढे गेला असता. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा या पक्षांना येथे मते मागण्याचा अधिकार नाही, असा टोला सर्व विरोधी पक्षांना काँग्रेसचे राज्याचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी घावनळे येथील पत्रकार परिषदेत लगावला.
काँग्रेसचे प्रचारप्रमुख तथा कुडाळ मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांनी घावनळे येथील प्रचार सभेदरम्यान पत्रकार परिषद आयोजित केली होती. या प्रचारसभेत राणेंनी भाजपा व इतर विरोधी पक्षांवर टीका केली.
यावेळी राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचे काम मोदी व सरकार करीत आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँकेची तीन कार्यालये दिल्लीत नेली.
पालघर येथील प्रशिक्षण केंद्र गुजरात पोरबंदरला नेले, तर मुंबई बंदर बंद करीत असून महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचे काम मोदी सरकार करीत असल्याचे व भाजपा विरुद्ध मी सर्वप्रथम बोेललेले मुद्दे आता शिवसेनेचे उध्दव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते स्वत:च्या प्रचार सभेत उपस्थित करीत आहेत, असे नारायण राणे यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख प्रकाश मोरये, प्रवक्ते सुनील बांदेकर व आंबा मुंज उपस्थित होते. (प्रतिनिधी)
४ या जिल्ह्यात प्रचार सभा घेण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदींना यावे लागले, यामध्ये माझी ताकद काय आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे माझी कॉलर अभिमानाने ताठ झाली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अजून का पूर्ण केली नाहीत, याबाबत आम्ही त्यांना निश्चितच प्रश्न विचारू, असे राणे यांनी सांगितले. एक्झिट पोलवर विश्वास नसून मी गेली ३५ वर्षे राजकारणात आहे. ही माझी आमदारकीची ही सातवी निवडणूक आहे. त्यामुळे या एक्झिट पोलवाल्यांना मी ओळखून असल्याचेही त्यांनी सांगितले.