बांदा शहरवासीयांना बिबट्याचे दर्शन
By Admin | Updated: November 9, 2014 23:40 IST2014-11-09T21:04:26+5:302014-11-09T23:40:15+5:30
परिसरात भीती : वनविभागाने लक्ष देण्याची गरज

बांदा शहरवासीयांना बिबट्याचे दर्शन
बांदा : बांदा शहरातील निमजगावाडी येथे भर वस्तीतील बांदा- वाफोली हमरस्त्यावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दृष्टिस पडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने रस्त्यावरच ठाण मांडल्याने या मार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. मात्र, बिबट्याने पाच मिनिटांनंतर जवळच्या झाडीचा आश्रय घेतला. या घटनेनंतर वनविभागाने याची दखल घेत उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
वाफोली, निमजगा परिसरात गेले काही दिवस बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे. बिबट्याचा वावर भर वस्तीत असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेले कित्येक दिवस बिबट्या नजरेस पडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. गतवर्षी भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या वाफोली येथे विहिरीत पडून मृत झाला होता. त्यानंतर पुन्हा या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे.
काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निमजगावाडी येथील भर वस्तीतील रस्त्यावर बिबट्याचे दर्शन वाहनचालकांना झाले. रस्त्यावर पाच मिनिटे बिबट्या घुटमळला. त्यानंतर त्याने लगतच्या झाडीत आश्रय घेतला. अचानक बिबट्या रस्त्यावर अवतरल्याने वाहनचालकांची बोबडी वळाली.
अद्यापपर्यंत या परिसरात बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ला होण्याची घटना घडली नसली तरीही बिबट्याच्या मुक्त वावरामुळे स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. बांदा-वाफोली मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. तसेच निमजगावाडी हा भाग बांदा शहरात येत असल्याने याठिकाणी नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे या बिबट्याचा वनखात्याने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांतून होत
आहे. (प्रतिनिधी)