कणकवलीच्या सिद्धेश सावंतचे साहस
By Admin | Updated: November 14, 2014 00:14 IST2014-11-14T00:12:17+5:302014-11-14T00:14:26+5:30
हिमालय पर्वतावर चालण्याचे ‘अॅडव्हेंचर’ प्रशिक्षण

कणकवलीच्या सिद्धेश सावंतचे साहस
कणकवली : कणकवली कॉलेजमधील तृतीय वर्ष कला या वर्गातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सिद्धेश संतोष सावंत याने हिमालय पर्वतावर चालण्याचा अॅडव्हेंचर प्रशिक्षण कॅम्प नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
हा कॅम्प हिमाचल प्रदेश शासनाच्यावतीने अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्युट आॅफ माऊंटनीअरिंग अॅन्ड अलाईड स्पोटर््स या संस्थेने कुलू मनाली (हिमाचल प्रदेश) येथे आयोजित केला होता. या कॅम्पचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील युवकांमध्ये गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीवा व नेतृत्व गुण विकसित व्हावेत, साहस निर्माण व्हावे असा आहे. भारतातील एकूण ६६ स्वयंसेवक या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या १० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. सिद्धेश सावंत हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव स्वयंसेवक आहे.
सिद्धेश सावंत याने हिमालय पर्वतावर हनुमान डिंबा या भागामध्ये दोराच्या सहाय्याने पर्वतावर चढणे, खाली उतरणे, नदी पार करणे आदी साहसी प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. एकूण सहा दिवसांच्या कालावधीमध्ये त्याने पर्वतावर ७० किलोमीटर म्हणजेच १० हजार ५०० फूट उंचीपर्यंत पर्वतावर चढण्याची कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी त्याने थंडगार हवा व बर्फावरून चालण्याचा आणि घसरण्याचा आनंद लुटला. कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत विविध उपक्रमात सिद्धेश सावंत याचा सक्रीय सहभाग असतो. त्याच्या अंगी नेतृत्व गुणकौशल्ये आहेत. जून २०१४ मध्ये नागपूर येथे झालेला आव्हान कॅम्प त्याने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
सिद्धेश सावंत याचे या साहसी कामगिरीबद्दल कणकवली कॉलेज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाईसाहेब खोत, चेअरमन पी. डी. कामत, सचिव विजयकुमार वळंजू तसेच प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. प्राचार्य डॉ. शिंदे यांच्या हस्ते सिद्धेश सावंत याला प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सिद्धेश सावंत याला राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. खंडेराव कोतवाल यांचे मार्गदर्शन तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे व प्रा. बाळासाहेब राठोड यांचे प्रोत्साहन
लाभले. (प्रतिनिधी)