हरकुळ बुद्रुक पंचायतला कारणे दाखवा नोटीस
By Admin | Updated: December 29, 2014 23:35 IST2014-12-29T21:59:51+5:302014-12-29T23:35:40+5:30
मंत्र्यांचे लक्ष वेधले : दत्तक ग्राम योजना नाकारली

हरकुळ बुद्रुक पंचायतला कारणे दाखवा नोटीस
ओरोस : खासदारांकडून दत्तक गाव घ्यावयाची आदर्श दत्तक ग्राम योजना हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत स्विकारण्यास तयार नसल्याबाबत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले. केसरकर यांनी यासंदर्भात गंभीर दखल घेत ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिले आहेत.
केंद्र शासनाच्या योजनेत प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन त्या गावात आदर्श दत्तक ग्रामयोजना राबवून केंद्र शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करावी व ही संकल्पना सर्वांनी राबवावी. त्याप्रमाणे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक हे गाव दत्तक घेतले. मात्र ते गाव दत्तक घेताना आदर्श दत्तक ग्राम योजना राबविण्यासाठी संबधित ग्रामपंचायत बॉडीचा ठराव आवश्यक असतो. परंतु खासदार अरविंद सावंत यांनी हरकुळ बुद्रुक गाव दत्तक घ्यायचा निर्णय होऊनसुद्धा ग्रामपंचायत बॉडी ही योजना स्विकारण्यास तयार नाही. त्यामुळे खासदार अरविंद सावंत यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे त्यांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आदर्श दत्तक ग्राम योजना हरकुळ ग्रामपंचायत राबविण्यास तयार नसेल तर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला. खासदार सावंत यांच्या तक्रारीची केसरकर यांनी दखल घेत त्या ग्रामपंचायतीला कारणेदाखवा नोटीस बजावा असे आदेश जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. (वार्ताहर)