शिवशाहीर पुरंदरेंचे सिंधुदुर्गशी होते विशेष ऋणानुबंध, 'ते' स्वप्न राहिले अपुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 07:02 PM2021-11-15T19:02:48+5:302021-11-15T19:07:06+5:30

माजी आमदार परशुराम उपरकर यांनाच सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळ एक कलादालन उभारण्याचे त्यांनी ठरवले होते. या कलादालनातून महाराजांचा इतिहास प्रकटला जाणार होता.

Shivshahir Purandare had a special bond with Sindhudurg | शिवशाहीर पुरंदरेंचे सिंधुदुर्गशी होते विशेष ऋणानुबंध, 'ते' स्वप्न राहिले अपुर्ण

शिवशाहीर पुरंदरेंचे सिंधुदुर्गशी होते विशेष ऋणानुबंध, 'ते' स्वप्न राहिले अपुर्ण

Next

अनंत जाधव
सावंतवाडी : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे  निधन झाले आणि त्यांचे अलौकिक कार्य प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आले. संपूर्ण जगात शिवशाहीर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बाबासाहेबांचे सिंधुदुर्गशी विशेष ऋणानुबंध होते. त्याचे मालवण येथे कलादालन उभारण्याचे स्वप्न मात्र अपुरे राहिले. अनेक वेळा बाबासाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. त्यांनी सिंधुदुर्ग किल्याला अनेक वेळा भेटी दिल्या. ते किल्ल्यावर गेले की महाराजांच्या आठवणीत रममाण होत होते. सिंधुदुर्ग वासियाच्या आग्रहाखातर दोनवेळा जाणता राजा हे नाटक ही जिल्ह्यात आणले होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एक शिवसृष्टीच उभी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अलौकिक विचार आणि कार्य युवा पिढी बरोबरच जुन्या पिढी पर्यंत पोचविण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले. बाबासाहेबांच्या सिंधुदुर्ग बद्दलच्या अनेक आठवणी आहेत. ते वर्षातून सात ते आठ वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असत सिंधुदुर्ग किल्यावर गेले की ते शिवाजी महाराजांच्या आठवणीत रममाण होत असत. महाराज कसे किल्यावर पोचले आणि कसा इतिहास साकारला हे सांगत असताना समोर असलेल्या शिवप्रेमींना ही एक वेगळीच उर्जा त्याच्यात दिसून येत असे.

जिल्ह्यात आल्यावर ते माजी आमदार परशुराम उपरकर याच्या शिवाय कुठे ही जात नसत. जिल्ह्यातील शाळा शाळामध्ये बाबासाहेबांनी शिवाजी महाराज यांच्या वर व्याख्याने दिली. प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडे महाराजा बद्दल वेगवेगळ्या आठवणी होत्या. जाणता राजा हे त्यांचे नाटक सिंधुदुर्ग वासियासाठी एक पर्वणीच होती. या ठिकाणी तसे हे नाटक करणे अवघड होते पण उपरकर याच्या पुढाकारातून हे नाटक जिल्ह्यात आणले.

बाबासाहेब एवढ्यावरच थांबले नाहीत. तर, त्यांनी उपरकर यांनाच सोबत घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळ एक कलादालन उभारण्याचे ठरवले होते. या कलादालनातून महाराजांचा इतिहास प्रकटला जाणार होता. जेणे करुन भावी पिढीला पासून अबाल वृध्दापर्यत सर्वाना इतिहास समजला पाहिजे यासाठी हा सर्व त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी मालवण सुकळवाड येथे जागा ही पाहिली होती. आणि काही जागेच्या शोधात ते होते.

पण दहा दिवसापूर्वीच बाबासाहेबांनी उपरकर यांच्याशी संपर्क करत मी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो आहे. आपले ते कलादालनाचे काम लवकर पूर्ण करूया असे सांगितले होते. मात्र अखेर आज त्यांच्या मृत्यूचीच बातमी कानावर आली आणि त्यांचे कलादालन उभारण्याचे स्वप्न ही अपुरे राहिल्याचे शल्य कायम राहिले.

विनम्रपणा ही बाबासाहेबांना देण

बाबासाहेब हे महाराजांवर व्याख्यान देण्यासाठी अनेक ठिकाणी जात. लहानशा गावात ही ते गेले त्यांना कुणीही आपल्या घरी बोलवले तर ते कधी जाणे नाकारत नसत. आवडीने सर्व सामान्यांच्या घरी जात त्याच्यात असलेला विनम्रपणा हा अनेकांना भावत असे.

Web Title: Shivshahir Purandare had a special bond with Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.