शिवसेनेने रोखला कमळावर ‘बाण’

By Admin | Updated: December 26, 2014 00:12 IST2014-12-25T22:55:05+5:302014-12-26T00:12:10+5:30

रत्नागिरी पालिका : समिती सभापतींची आज निवड

Shivsena launches 'Arrow' | शिवसेनेने रोखला कमळावर ‘बाण’

शिवसेनेने रोखला कमळावर ‘बाण’

रत्नागिरी : येथील नगरपालिकेत सेना-भाजप युती तुटल्यानंतर उद्या, शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत सर्व विषय समित्यांची सभापतिपदे शिवसेना व शहर विकास आघाडी यांच्याकडे जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपद भाजपकडे व विषय समित्या सेनेकडे अशी विचित्र स्थिती निर्माण होणार आहे. कमळावर शिवसेनेने धनुष्यबाण रोखल्यासारखे हे राजकीय चित्र असून, ही राजकीय कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्याकडे हुकुमाची काही पाने शिल्लक आहेत का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील युती तुटली व सर्व राजकीय समीकरणेच बदलून गेली. निवडणुकीनंतर राज्याच्या सत्तेत पुन्हा ‘युतीचा पाट’ लावला गेला असला, तरी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र त्याचे अनुकरण अद्यापही झालेले नाही. रत्नागिरी नगरपालिकाही त्यातीलच एक ‘राजकीय प्रकरण’ आहे. दिलेल्या शब्दाप्रमाणे भाजपचे मयेकर यांनी नगराध्यक्षपद सोडून ते शिवसेनेसाठी मोकळे केले नाही, याबाबतची खदखद शिवसेनेत आहे. त्यातूनच नगराध्यक्षांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
याआधीच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी नगरसेवकांच्या मदतीने भाजपचाच उपाध्यक्ष निवडून आणायचा व शिवसेनेवर कुरघोडी करायची, असा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, सेनेनेच राष्ट्रवादीचे चार नगरसेवक गळाला लावले व उपनगराध्यक्षपदी सेनेचे संजय साळवी यांची निवड झाली. त्यानंतर भाजपविरुद्ध शिवसेना असे ‘कडवे शीतयुद्ध’ रत्नागिरी पालिकेत सुरू झाले आहे. पालिकेतील शिक्षण, नियोजन, बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, पाणी या सहा समित्यांची सभापतिपदे व सदस्य तसेच स्थायी समितीसाठी उद्या निवडणूक होत आहे. यावेळच्या निवडणुकीत एकही सभापतिपद भाजपला मिळू द्यायचे नाही, अशीच रणनीती शिवसेनेने आखली आहे. त्यामुळे भाजपऐवजी यावेळी सेनेबरोबर असलेल्या चारजणांच्या शहर विकास आघाडीला सेनेकडून दोन सभापतिपदे मिळण्याची शक्यता आहे. सर्वच सभापतिपदे सेना-आघाडीने काबीज केल्यास नगराध्यक्ष मयेकर हे एकाकी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


संख्याबळ १७
रत्नागिरी पालिकेत २८ नगरसेवकांपैकी १३ नगसेवक शिवसेनेचे असून, त्यांना पाठिंबा देणारे शहर विकास आघाडीचे चार नगरसेवक मिळून सेनागटाचे संख्याबळ १७ एवढे झाले आहे.
सेनेचे दोन नगरसेवक उमेश शेट्ये व उज्ज्वला शेट्ये हे मूळ राष्ट्रवादीतून सेनेत आलेले आहेत. त्यामुळे त्यांना गृहीत न धरताही १५ संख्याबळावर समिती सभापतिपदे काबीज करण्यात सेना-आघाडीला यश मिळेल.
भाजपकडे ८, राष्ट्रवादीचे २ व कॉँग्रेसचा १ नगरसेवक असल्याने ११ संख्याबळ झाले, तरी समिती सभापतिपद मिळविताना अवघड जाणार आहे.

Web Title: Shivsena launches 'Arrow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.