शिवसेनेत कामांची धमक नाही

By Admin | Updated: January 29, 2016 23:59 IST2016-01-29T23:27:10+5:302016-01-29T23:59:35+5:30

नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत टोला; चौपदरीकरण कार्यक्रमात सेनेची फजिती

Shivsena has no work threat | शिवसेनेत कामांची धमक नाही

शिवसेनेत कामांची धमक नाही

रत्नागिरी : युतीच्या काळात मी मुख्यमंत्री असताना व नितीन गडकरी बांधकाम मंत्री असताना चौपदरीकरणाचा निर्णय घेतला होता. मात्र, आजच्या कार्यक्रमात शिवसेनेची खरी फजिती झाली. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये कोकणातील विकासकामे करून घेण्याची धमक नाही. त्यामुळे शिवसेना म्हणजे नुसतेच ट्रेलर आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला.
चौपदरीकरणाच्या संदर्भात गेल्या वर्षभरापासून काँग्रेसतर्फे आम्ही आंदोलन करत होतो. यामध्ये किती जागा जाणार, त्याचा दर काय मिळणार व मोबदल्याचे पैसे कधी मिळणार याबाबत खुलासा होत नव्हता. जिल्हा प्रशासनाची ही जबाबदारी होती. मात्र, आज गडकरींनी चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाला आपल्याला बोलावले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आपण या कार्यक्रमात चौपदरीकरणाबाबत ज्या सूचना केल्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या आहेत.
तसेच जैतापूरपेक्षा जमिनीची अधिक किंमत चौपदरीकरण प्रकल्पात शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही मागणीही मान्य झाली असून, हेक्टरी ४० लाखापर्यंत मोबदला मिळणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार काम होणार असल्याने कॉँग्रेसने आंदोलने मागे घेतली आहेत. मात्र, कुठेही भूसंपादनावेळी जबरदस्ती झाली तर कॉँग्रेस गप्प बसणार नाही.
भिडे नामक व्यक्तीने मुंबई ऐवजी रायगडाच्या पायथ्याशी शिवरायांचे स्मारक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामागे बोलविता धनी वेगळाच आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)


1 फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिफायनरीचा प्रकल्प होणार असल्याची घोषणा केली. मात्र, प्रस्तावापलिकडे त्यात काहीही नाही. १५ हजार एकर म्हणजे काय हे यांनी पाहिलेय काय? त्यातील पाच हजार एकरमध्ये जंगल उभारणार असे ते सांगतात. आधी आहेत ती जंगले वाचवा. रिफायनरी प्रकल्प प्रदूषणकारी नाही, असे हे म्हणतात. परंतु, तज्ज्ञांकडून याबाबत खात्री करून घेणार आहे. जर प्रदूषणकारी प्रकल्प असेल तर तीव्र विरोध केला जाईल, असे राणे म्हणाले.


2सेनेच्या आमदारांमध्ये दम नाही. हे सरकारमध्ये आहेत की नाही हे त्यांचे त्यांनाही माहीत नाही, अशी स्थिती आहे. सेनापक्षप्रमुख सरकारमधून बाहेर पडायची केवळ धमकी देतात. परंतु, ते सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत. भाजपही चिकट आहे. त्यामुळे सत्ता सोडणार नाही.
3स्मार्ट सिटीच्या यादीत मुंबईचा समावेश नाही. मोदी यांनी मुंबईवर सूड उगवण्याची एकही संधी सोडलेली नाही. मुंबईचे महत्व कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Shivsena has no work threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.