आंबोलीतील पर्यटन महोत्सवावर लाखोंची उधळपट्टी, शिवराम दळवीचा आरोप

By अनंत खं.जाधव | Published: August 19, 2023 04:42 PM2023-08-19T16:42:44+5:302023-08-19T16:43:45+5:30

आंबोली हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी जवळपास पाच ते सात लाख पर्यटक या हंगामात येतात.

Shivram Dalvi alleges waste of lakhs on tourism festival in Amboli | आंबोलीतील पर्यटन महोत्सवावर लाखोंची उधळपट्टी, शिवराम दळवीचा आरोप

आंबोलीतील पर्यटन महोत्सवावर लाखोंची उधळपट्टी, शिवराम दळवीचा आरोप

googlenewsNext

सावंतवाडी : जिल्हा प्रशासन आणि पर्यटन संचालनालय यांच्यावतीने आयोजित आंबोली पर्यटन महोत्सवावर लाखोंची उधळपट्टी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. या महोत्सवात स्थानिक व्यापारी व ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही? महोत्सवावर लाखो रुपयांची उधळपट्टी नेमकी कोणासाठी आणि कशासाठी याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार व आंबोली येथील हॉटेल उद्योजक शिवराम दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

आंबोली हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी जवळपास पाच ते सात लाख पर्यटक या हंगामात येतात. देशी-विदेशी पर्यटक आंबोलीचे पावसाळी सौंदर्य पाहण्यासाठी येतात. त्याचाच फायदा घेऊन आत्ताच प्रशासनाला या हंगामात पर्यटन महोत्सव घेण्याची जाग आली. मात्र, त्यांच्या नियोजनाप्रमाणे पर्यटक या महोत्सवाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे पर्यटन महोत्सवातून नेमके काय साध्य झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आंबोली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन पत्रिकेत अनेक मंत्री, आमदारांची नावे होती. मात्र, त्यातील एकतरी मंत्री या पर्यटन महोत्सवाला आला का ? मग ही उधळपट्टी कोणासाठी केली गेली. याची चौकशी आम्हाला करावी लागेल. जर शासनाने हा महोत्सव भरविला होता, तर त्यासाठी किती खर्च झाला, हे त्यांनी जाहीर करावे.

आंबोली घाटामध्ये पर्यटक पुरुष व महिला यांच्यासाठी शौचालयाची सोय नाही. आंबोलीमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने सोयी-सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. आधी सुविधा शासनाने द्यायला हव्यात आणि नंतर पर्यटन महोत्सव भरवावा. मी या भागात ४० वर्षांपूर्वी पहिले थ्री स्टार हॉटेल उभारले. त्यामुळे मला आंबोलीतील प्रत्येक भागाविषयी जाण आहे. त्यामुळे आंबोलीत काय सुविधा हव्यात आणि येथील स्थानिकांना काय हवे. याची मला कल्पना आहे, असेही दळवी यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Shivram Dalvi alleges waste of lakhs on tourism festival in Amboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.