दोडामार्गात शिवजयंती होणार शाही उत्साहात
By Admin | Updated: January 29, 2015 23:29 IST2015-01-29T21:55:45+5:302015-01-29T23:29:55+5:30
कमिटीची स्थापना : देखाव्यांसह महानाट्याचे सादरीकरण

दोडामार्गात शिवजयंती होणार शाही उत्साहात
दोडामार्ग : दोडामार्ग तालुका शिवजयंती महोत्सव तिथीप्रमाणे ८ मार्च रोजी दोडामार्ग येथे भव्य दिव्य अशा स्वरूपात होणार आहे. महोत्सवाच्या नियोजनासाठी तालुक्याची कोअर समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली. भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.शिवजयंती महोत्सवानिमित्त साटेली - भेडशी गोवेकर कलामंच येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीला नवनाथ बोराडे, गणेश ठाकूर, निखिल नाईक, साईनाथ डुबळे, नीलेश गोवेकर, प्रदीप उर्फ अम्या मयेकर, कानू दळवी, सतिश परब, नीलेश गवस, जयवंत आठलेकर, भरत दळवी, नीलेश साळगावकर, नीलेश धर्णे, मुकूंद नाईक, अमित बिडये, भिवा गवस, महादेव नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी कोअर कमिटीचे गणेश ठाकूर म्हणाले, शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. उत्तुंग हिमालयासारखे त्यांचे काम आहे. म्हणून आज ३५0 वर्षानंतर ही जगात नाव घेतले जाते. येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराजांचे आचारविचार समजावेत. त्यांचे गुण आत्मसात करावेत. यासाठी महोत्सव कार्यक्रम होणे आवश्यक आहेत. राजे हे आमचे दैवत असल्यामुळे कठीण प्रसंगी तुम्ही त्यांचे स्मरण कराल तर निश्चित मार्ग मिळेल.
महोत्सव कार्यक्रमाचे स्वरूपामध्ये चार ठिकाणी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे. यामध्ये तिलारी, साटेली - भेडशी, सासोली, दोडामार्गमध्ये मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे. मर्दानी खेळ घाटमाथ्यावर होतात. या खेळाचे प्रशिक्षण आपल्या जिल्ह्यातील तरूणांना मिळाले पाहिजे. बाजीप्रभुंनी दोन हातात तलवारी घेऊन पावनख्ािंड लढविली. दोन हातात तलवारी घेऊन कसे दुश्मनाशी लढता येईल, याचे प्रात्यक्षिक होणार आहे. या मर्दानी खेळातून तरूणांनी आपलं आत्मसंरक्षण करावं यातून दिसणार आहे.
दुसऱ्या जलाभिषेकाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यातून प्रत्येक गावात शिवप्रेमी आहेत. प्रत्येक गावातून एका कुटुंबाने गावातील जलकुंभ घेऊन दोडामार्ग महोत्सव ठिकाणी यायचं आहे. याच पाण्याने शिवाजी महाराजांचा जलाभिषेक होणार आहे.
शिवाजी महाराजांच्या आत्मचरित्रावर महानाट्यप्रयोग सादर होणार आहे. यासाठी सासोलीतील शिवप्रेमी गणेश ठाकूर यांनी ५0 फूट उंचीचा मोठा आकर्षक किल्ला बनविलेला आहे. हा किल्लाच म्हणजे प्रमुख आकर्षण बनणार आहे. महोत्सवात येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमींना आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासात आहोत, असा भास होणार आहे. हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर बोलणारे ख्यातनाम वक्ते महोत्सवात मार्गदर्शन करणार आहेत. ८ मार्च रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याने प्रत्येक कार्यक्रमासाठी कोअर समितीमार्फत समित्या नेमण्यात येणार आहे.
या समित्यांमध्ये तालुक्यातील युवक, युवतींनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील शिवजयंतीचा आवाज महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे, अशा प्रकारचे स्वरूप या महोत्सवाचे असणार
आहे. याकरीता तालुका, जिल्हापातळीवरील सर्व राजकीय नेतेमंडळी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, नोकरवर्गाचा उस्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले
आहे. (प्रतिनिधी)