राष्ट्रवादीला शिवसेनेचा ‘दे धक्का’
By Admin | Updated: July 2, 2015 22:43 IST2015-07-02T22:43:50+5:302015-07-02T22:43:50+5:30
केळवली जिल्हा परिषद गटात युतीचे सरवणकर विजयी

राष्ट्रवादीला शिवसेनेचा ‘दे धक्का’
राजापूर : मागील दोन निवडणुकातील अपयश धुवून काढत शिवसेनेने केळवली जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत यश मिळवले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लढतीत शिवसेनेचे रामचंद्र सरवणकर यांनी काँग्रेस आघाडीचे दीपक बेंद्रे यांचा ८७० मतांनी पराभव केला. सात वर्षांनंतर केळवली जिल्हा परिषद गटावर पुन्हा भगवा फडकला.
राष्ट्रवादीचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिनेश जैतापकर हे अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या केळवलीच्या जागेसाठी ३० जूनला मतदान घेण्यात आले. एकूण १० हजार २६४ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. गुरुवारी सकाळी १० वाजता राजापूर तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. दोन्ही उमेदवारांसह त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात उपस्थित होते.
मतमोजणीअंती पहिल्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार दीपक बेंद्रे यांना १३८६, तर शिवसेनेचे रामचंद्र सरवणकर यांना १९१६ मते मिळाली होती. यावेळी सरवणकर ५३० मतांनी आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीत दीपक बेंद्रे यांनी १६ मतांची नाममात्र आघाडी घेतली. या फेरीत बेंद्रे यांना २२१७, तर सरवणकर यांना २२०१ मते मिळाली होती. अखेरच्या ७ मतदान केंद्राचा कौल कोणती दिशा घेतो, त्यावरच विजयाचे गणित ठरणार होते. या फेरीत बेंद्रे यांना ९१८, तर सरवणकर यांना १२७३ मते मिळाली आणि शिवसेनेने केळवलीचा गड काबीज केला. शिवसेना उमेदवार रामचंद्र सरवणकर ८७९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले.
या निवडणुकीसाठी एकूण १० हजार २६४ मतदान झाले होते. त्यापैकी बेंद्रे यांना ४ हजार ५२१, तर रामचंद्र सरवणकर यांना ५ हजार ३७ मते पडली. ३५३ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला.
या विजयानंतर आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, केळवलीचे विभागप्रमुख नरेश दुधवडकर, शहरप्रमुख अनिल कुडाळी, महिला आघाडीप्रमुख योगिता साळवी, नगरपरिषदेचे गटनेते अभय मेळेकर, यांच्यासह सर्वांनी जल्लोष केला. (प्रतिनिधी)
हा विजय शिवसैनिकांसह पक्षाच्या ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकारी यांचा असून केळवली जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू.
- रामचंद्र सरवणकर
नूतन जिल्हा परिषद सदस्य
या विजयाने सेना राजापूर तालुक्यात भक्कम असून, दीड वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीत असेच घवघवीत यश मिळवण्यासाठी सज्ज रहा.
- आमदार राजन साळवी
राजापुरात जिल्हा परिषद संख्याबळ वाढून ते पाच एवढे झाले आहे तर मित्रपक्ष भाजपचा एक सदस्य असे मिळून सहावर पोहोचले आहे. युतीने सहाच्या सहा जागा जिंकून काँग्रेस राष्ट्रवादीला भुईसपाट केले आहे. काँग्रेसचे कोदवलीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुरव यापूर्वीच भाजपात गेले. राष्ट्रवादीचे सदस्य अपात्र ठरल्याने आघाडीची पाटी कोरी राहिली आहे.