कणकवली: शिवरायांनाही स्वराज्य निर्मितीसाठी संघर्ष करावा लागला होता. राज्यपाल यांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. तर राज्य तोडण्याचे काम भाजपाने केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्ता जाणार हे अगोदरच माहीती होते. मात्र, आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज आला आहे. भाजपकडून अनेकांना भीती दाखवली जात आहे.त्यांची विविध प्रकारची चौकशी लावली जात आहे.पण त्यांच्या दहशतीला शिवसेना भीक घालणार नाही. वेळ पडल्यास जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू.असा इशारा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिला.कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रे अंतर्गर जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे, संजना घाडी, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, आता काळ संघर्षाचा आहे. कसोटीचा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायत निडवणुका आहेत. त्यांच्या निकालातून दिसेल की जनता व आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. कोकणात भाजलेल्या कोंबडीला आगीची भीती नाही, अशी म्हण आहे. आम्हाला कसलीही भीती नाही. या सभेच्या निमित्ताने पोलिसांनी आम्हाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे सुषमा अंधारे तुम्ही जे बोलायचे आहे ते इथे बोला. कारण आम्हाला पोलीस ठाण्यात जायचेच आहे, अशी आम्ही मानसिकता ठेवली असल्याचे नाईक यांनी सांगितले.संजय पडते म्हणाले, शिवसेना केव्हाही संपणार नाही. आगामी निवडणुका आहेत, त्या ठिकाणी शिवसेना लढणार आहे.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील शिवसैनिक आमदारकीची निवडणूक केव्हा लागते? याची वाट पहात आहेत. कारण त्यांना गद्दाराना अद्दल घडवायची आहे.सतीश सावंत म्हणाले, राज्यात नवीन भाताच्या जाती प्रमाणे 'गद्दार ४०' ही नवीन जात आली आहे. ती आपल्याला नष्ट करायची आहे.येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण हे विचार जनतेपर्यंत पोचवले पाहिजेत. राज्याला अधोगतीकडे नेण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सुषमा अंधारे यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करा.संदेश पारकर म्हणाले, सुषमा अंधारे या राज्यात प्रबोधन करत आहेत. पोलीस आम्हाला नोटीसा देत आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. आम्हाला कोणी डीवचल्यास आम्ही त्यांना जशाच तसे उत्तर देणार आहोत. टोल नाका विरोधी आंदोलन आम्ही छेडले आहे. टोलचा ठेकेदार हा एक केंद्रीय नेता आहे.त्यामुळे शिवसेना जनतेच्यासोबत कायम राहणार आहे.अतुल रावराणे म्हणाले, खासदार विनायक राऊत यांच्यामुळेच कोकणातील दहशतवाद गाढला गेला. तर दहशतवादाचे मुळ आमदार वैभव नाईक यांनी उखडले आहे.कणकवलीचे आमदार हे स्टंटबाज आहेत.मिंदे गटाचे आमदार दहशतवादाला कारणीभूत असलेल्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.त्यांना आता धडा शिकवूया.असेही ते म्हणाले.गौरीशंकर खोत म्हणाले, जिल्ह्यात भाजपने असंतोष निर्माण केला तर तो राज्यभर तसेच देशभर पसरेल.त्यामुळे शिवसेनेला संपविण्याची भाषा कोणी करू नये. शिवसैनिकांनी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे. यावेळी काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज, आमदार वैभव नाईकांचा जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 14:32 IST