अणुऊर्जेला शिवसेनेचा विरोध नाही, पण....!
By Admin | Updated: February 20, 2015 23:10 IST2015-02-20T22:31:51+5:302015-02-20T23:10:10+5:30
अनंत गीते : साकुर्डे ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

अणुऊर्जेला शिवसेनेचा विरोध नाही, पण....!
शिवाजी गोरे - दापोली -राज्यात व कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही. राज्यामध्ये व कोकणात अणुऊर्जा प्रकल्प यायला हवेत. कोकणात येणाऱ्या प्रकल्पाचे शिवसेना स्वागत करेल. मात्र जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा शंभर टक्के विरोध असल्याने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. स्थानिकांचा असलेल्या विरोधाला शिवसेनेचा पाठींबा आहे. म्हणून शिवसेनेचा अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे, असे नाही, असे वक्तव्य केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी साकुर्डे ग्रामपंचायतीच्या ज्येष्ठ नागरिक सत्कार दरम्यान केले.यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्राध्यक्ष संदीप राजपुरे, पंचायत समिती सदस्य उन्मेश राजे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश कालेकर, महिला आघाडी प्रमुख उल्का जाधव, तालुका प्रमुख शांताराम पवार, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष शांताराम जाधव, पंचायत समिती सदस्य आशा जाधव, ज्योती विचारे, प्रांताधिकारी अनिल सावंत, नायब तहसील आंबेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट भेट देण्यात आली. आरोग्य तपासणी ज्येष्ठ नागरिक दाखल्याचे वाटपही करण्यात आले. देशात व राज्यात भाजपा शिवसेनेचे सरकार आहे. आता ग्रामीण भागाचा विकास दूर नाही. कोकणात येणाऱ्या वीज प्रकल्पाचे स्वागत करताना जैतापूरला शिवसेनेचा विरोध असल्याचे सांगून शिवसेना भाजपावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लपून राहिलेले नाही. अणुऊर्जा प्रकल्पाचे स्वागत करू, असे सांगून जैतापूरला मात्र विरोध कायम असल्याचे शिवसेनेचे सुचक वक्तव्य असल्याने भविष्यात जैतापूरचा विरोध मावळण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.
दिल्लीत ‘आप’ला जनमताचा कौल मिळाला. भाजपाला सत्ता मिळण्याची आशा होती. जनतेचा कौल महत्त्वाचा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू दिल्लीत चालली नाही म्हणणाऱ्या जनमताचा कौल महत्वाचा ठरला आहे. दिल्लीत आपचे सरकार आले असले तरी राज्यात व केंद्रात दोन्ही सरकारला धोका नाही असे ते म्हणाले.