शेखर निकम यांनी जिल्हाध्यक्षपद सोडले
By Admin | Updated: November 16, 2014 00:23 IST2014-11-16T00:21:49+5:302014-11-16T00:23:16+5:30
चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

शेखर निकम यांनी जिल्हाध्यक्षपद सोडले
चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे गुरुवारी दिला. मात्र, आपण चिपळूण मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार असून या मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी सदैव कार्यरत राहणार आहोत, असे शेखर निकम यांनी स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्ष म्हणून शेखर निकम यांनी साडेतीन वर्ष जिल्हाभर प्रामाणिकपणे व तळमळीने काम केले होते. पक्षांतर्गत गटबाजी नियंत्रित करण्यात त्यांना काहीअंशी यश आले होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाने विश्वास टाकून चिपळूण विधानसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊनही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांचा निसटता पराभव झाला. राष्ट्रवादीविरोधी असलेली लाट व पक्षांतर्गत कुरबुरी यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी जिल्ह्यात पक्षाला पूर्ण वेळ काम करु शकेल, अशा अध्यक्षाची गरज आहे. आपण शैक्षणिक व इतर कामामुळे इतका वेळ देऊ शकणार नाही. शिवाय चिपळूण मतदारसंघावर आपल्याला लक्ष केंद्रीत करावयाचे आहे. त्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे निकम यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आपण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असलो तरी पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांचे पाठबळ सदैव माझ्यामागे आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे यापुढेही आपण पवार यांच्या विचारांचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही निकम यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)