सरपंचांकडून अधिकारी धारेवर
By Admin | Updated: July 19, 2015 00:31 IST2015-07-19T00:31:18+5:302015-07-19T00:31:18+5:30
अनुपस्थितीबाबत नाराजी : चौके येथे सिंधु समाधान कार्यक्रम

सरपंचांकडून अधिकारी धारेवर
चौके : येथील सिंधु समाधान कार्यक्रमात विविध प्रश्नांचा भडीमार करत उपस्थित अधिकाऱ्यांना मालवण तालुक्यातील सरपंचांनी धारेवर धरले. या सिंधु समाधान कार्यक्रमाला गटविकास अधिकारी, इतर अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. याबाबतही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सिंधु समाधान कार्यक्रम शुक्रवारी चौके येथील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय सभागृहात मालवणचे नायब तहसीलदार एस.पी. खडपकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी निवडणूक नायब तहसीलदार चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, गटशिक्षणाधिकारी वसंत महाले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.जे. कोकाटे, पंचायत समिती सदस्या श्रद्धा केळूसकर, पशुधन विकास अधिकारी डी. व्ही. माईणकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवणचे आर. व्ही. फोेंडेकर, पंचायत समिती कृषी विभागाचे के.टी. पाताडे, व्ही. के. जाधव, लघु पाटबंधारे विभाग मालवणचे शाखा अभियंता अमित भोसले, मंडळ अधिकारी नामदेव जाधव, चौके हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. डी. सावंत, गोळवण सरपंच सुभाष लाड, साळेल सरपंच साबाजी गावडे, काळसे सरपंच चंद्रकांत दळवी, कुणकवळे सरपंच प्रकाश पोळ, आंबडोस सरपंच विष्णू परब, धामापूर सरपंच विजयकुमार धामापूरकर, आंबेरी सरपंच साक्षी कांबळी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे राम धनावडे, साळेलचे माजी सरपंच कमलाकर गावडे आदी मान्यवर आणि पंचक्रोशीतील ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, सेविका, मुख्याध्यापक, पोलीस पाटील आणि विविध खात्यांचे कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र चौकेच्यावतीने स्टॉल लावून आरोग्य तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, नेत्र तपासणी, रक्तगट तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली. याचा परिसरातील उपस्थित ग्रामस्थांनी लाभ उठवला. त्याचप्रमाणे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेचे तोंडभरुन कौतुक केले. (वार्ताहर)