शरद पवार गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार
By Admin | Updated: July 29, 2014 22:58 IST2014-07-29T22:21:36+5:302014-07-29T22:58:04+5:30
तिलारी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न : जलसंपदामंत्रीही महाराष्ट्राचा वाटा लगेच देणार

शरद पवार गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार
अनंत जाधव - सावंतवाडी
तिलारी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तीव्र होत असतानाच याप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची १० आॅगस्टला भेट घेणार आहेत. या भेटीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले आहेत. चार दिवसांपूर्वीच प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांच्या माध्यमातून पवार यांची भेट घेतली होती.
तिलारी प्रकल्पग्रस्तांनी गेल्यावर्षी कालव्यात आंदोलन करीत गोव्याचे पाणी बंद केले होते. यानंतर या प्रश्नात आमदार दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीने शरद पवार यांनी स्वत: लक्ष घातले होते. पवार स्वत: तिलारीमध्ये आले आणि प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. तसेच राज्य सरकारचे तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून यातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर गोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या स्तरावर अनेक बैठका झाल्या. या बैठकांमधून प्रकल्पग्रस्तांना वन टाईम सेटलमेंटमधून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे धोरणही जाहीर झाले होते. या धोरणाला अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणे गरजेचे होते. ही बैठकच झालेली नाही.
हा प्रश्न महाराष्ट्राच्या हाती असता तर तातडीने सोडविला असता, पण धरणाची जागा आमची आणि पाणी देणार गोव्याला. तसेच त्यांचा वाटा ७८ टक्क्यांचा असल्याने जास्तीत जास्त निधी तेच देणार आहेत. आम्ही फक्त यातील २२ टक्के रक्कम देणार आहोत. ती आम्ही आताही देण्यास तयार आहोत.
- हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री