विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: July 21, 2015 00:55 IST2015-07-21T00:53:08+5:302015-07-21T00:55:07+5:30
प्राध्यापक निलंबित : विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या दारात आंदोलन

विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
दापोली : येथील डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर याच महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक एस. पी. कुऱ्हेकर यांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या मुलीची विद्यापीठाकडे तक्रार आल्यानंतर विद्यापीठाने चौकशी समिती नेमून या चौकशी समितीत कुऱ्हेकर दोषी आढळल्याने त्यांच्यावर विद्यापीठाने तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे.
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदावर असणारे एस. पी. कुऱ्हेकर यांनी २३ मे रोजी याच महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. यानंतर त्या पीडित मुलीने विद्यापीठाकडे लेखी तक्रार केली. विद्यापीठाने तक्रारीची दखल घेऊन एक चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीच्या तपासात एस. पी. कुऱ्हेकर दोषी असल्याचे आढळले. तसा अहवाल चौकशी समितीने विद्यापीठाकडे १८ जुलैला सादर केला. यानंतर सोमवारी विद्यापीठाने कुऱ्हेकर यांना निलंबित केले; मात्र केवळ निलंबित करून त्यांना कठोर शासन व्हायला हवे असे म्हणत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करून एस. पी. कुऱ्हेकर यांना आमच्यासमोर हजर करा, अशा घोषणा देत पोलीस कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.
एस. पी. कुऱ्हेकर यांनी आमचा विश्वासघात केला आहे. आम्ही विद्यार्थिनींनी प्राध्यापकांकडे जाणे चुकीचे आहे का? असा राग व्यक्त करीत विद्यार्थिनींनीही पोलीस कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. कृषी विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. उत्तमकुमार महाडकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठ स्तरावर त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. विद्यापीठ स्तरावर कारवाई सुरूअसताना कायदा हाती घेऊ नका, असे आवाहन डॉ. महाडकर यांनी केले.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
डॉ. संजय भावे यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. एक महिन्यात नक्की कारवाई होईल. एक महिन्यात जर आम्ही न्याय देऊ शकलो नाही तर याच गेटवर आंदोलन करून तुम्ही न्याय मागू शकता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन मागे घेतले.