दर्शनासाठी यावर्षी सातवी रांग

By Admin | Updated: January 14, 2015 00:28 IST2015-01-13T23:00:21+5:302015-01-14T00:28:58+5:30

आंगणेवाडी यात्रा नियोजन : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा

Seventh queue this year for darshan | दर्शनासाठी यावर्षी सातवी रांग

दर्शनासाठी यावर्षी सातवी रांग

मालवण : दर्शन व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी दरवर्षीच्या सहा रांगांबरोबरच एका जादा रांगेची व्यवस्था करून एकूण सात रांगांची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे यांनी दिली.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आंगणेवाडी श्री भराडीदेवी यात्रोत्सवाच्या नियोजनाच्या बैठकीस जिल्हा प्रशासनाला वेळ मिळत नसताना मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांनी आंगणेवाडी येथे बैठक घेऊन आंगणेवाडी ग्रामस्थांकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती घेतली.तसेच यात्रेदरम्यान पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षा यंत्रणेबाबत व गर्दीवर नियंत्रण मिळविण्याच्यादृष्टीने मंदिर परिसराची पाहणी करून आढावा घेतला. तसेच याबाबत पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचनादेखील केल्या. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांच्यासमवेत मालवणचे पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, पोलीस राणे, जोशी, तसेच नरेश आंगणे, सतीश आंगणे, चंद्रकांत आंगणे, सचिन आंगणे, विठ्ठल आंगणे आदी उपस्थित होते. मंदिरालगतच्या परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे दर्शन व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे फेरीवाल्यांना अटकाव करावा, अशी मागणी नरेश आंगणे यांनी केली. तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूकडील रस्ते व भोगलेवाडी तिठा ते मंदिर हा रस्ता खराब झाला असून त्याच्या दुरूस्तीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावी. त्याचप्रमाणे यात्रा नियोजनाचा अद्ययावत आराखडा लवकरच प्रशासनाला सुपूर्द करू, असे आंगणे यांनी सांगितले. महसूल विभागाचे तालुका आणि जिल्हा प्रशासन आंगणेवाडी यात्रा नियोजनाबाबत दरवर्षी तीन ते चार बैठका ग्रामस्थांसमवेत घेते. मात्र, यावर्षी अद्यापही प्रशासनाने एकही बैठक घेतलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या दिरंगाईबाबत ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली
आहे. (प्रतिनिधी)


मंदिर परिसरात एकूण आठ मंडप
मंदिर परिसरात हिरवे कारपेट
यात्रेदरम्यान होणारा धुळीचा त्रास कमी करण्यासाठी मंदिर परिसरातील मंडपांमध्ये हिरवे कारपेट पसरविण्यात येणार आहे. मंदिरालगतचा सुमारे ५०० मीटरपर्यंतचा परिसर कारपेटने आच्छादित करण्यात येणार आहे.


आपत्कालिन परिस्थितीत मंदिराच्या दोन्ही बाजूच्या मंडपांमध्ये सुमारे एक हजार भाविक सामावू शकतील, अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. जेणेकरून अशावेळी गर्दीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, अशी माहिती नरेश आंगणे यांनी दिली.

दरवर्षी दर्शनासाठी सहा रांगा असतात. मात्र यावर्षी आणखी एका जादा दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात येणार आहे. दर्शन व्यवस्थेवरील ताण कमी व्हावा, तसेच मंदिराशेजारील परिसरात गर्दी कमी करण्यासाठी व कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी अतिरिक्त दर्शन रांग निर्माण करण्यात येणार आहे.
- नरेश आंगणे,
ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष, आंगणेवाडी


मंदिर परिसराची आपण आज पाहणी केली आहे. आंगणेवाडीची यात्रा दक्षिण कोकणातील सर्वात मोठी यात्रा असल्याने यात्रेदरम्यान उसळणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस यंत्रणेचे राखीव पथक तैनात करण्यात येणार आहे.
- विजय खरात,
उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली


गेल्यावर्षी यात्रेदिवशी रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत मंदिर परिसरात अचानक गर्दी वाढल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली होती. त्यामुळे यावेळी दर्शनाच्या रांगांमध्ये व दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करावा. जेणेकरून गेल्यावर्षीची चूक टाळता येणे सहज शक्य होईल
- विश्वजीत बुलबुले
पोलीस निरीक्षक, मालवण

Web Title: Seventh queue this year for darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.