झारीतील शुक्राचार्यांचा बंदोबस्त करू : ठाकरे
By Admin | Updated: October 9, 2014 00:18 IST2014-10-09T00:01:16+5:302014-10-09T00:18:49+5:30
जमिनी लाटणाऱ्यांना सोडणार नाही

झारीतील शुक्राचार्यांचा बंदोबस्त करू : ठाकरे
वेंगुर्ले : विकासाला ‘खो’ घालणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांच्या बंदोबस्तासाठी शिवसेना समर्थ आहे. आम्ही प्रकल्पासाठी कोणाच्याही जमिनी लाटू देणार नाही आणि जमिनी लाटणाऱ्यांना सोडणारही नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे नाव न घेता दिला. विजयाचे तोरण बांद्यातून बांधण्यास सुरुवात करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेना उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ आज, बुधवारी येथील साई मंगल कार्यालयात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी आमदार शंकर कांबळी, उद्योजक पुष्कराज कोले, महिला आघाडीप्रमुख स्नेहा तेंडुलकर, सहसंपर्कप्रमुख शैलेश परब, अनारोजीन लोबो, सुकन्या नरसुले आदी उपस्थित होते.
वेंगुर्ले येथे ५० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले आहे; मात्र काही झारीतील शुक्राचार्यांनी ते होऊ दिले नाही. या झारीतील शुक्राचार्यांचा बंदोबस्त करायला शिवसेना समर्थ आहे. या रुग्णालयाचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार आणि त्याला द्वारकानाथ कोटणीसांचे नाव देणार असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना विकासाचे व्हिजन घेऊन जनतेसमोर आली आहे. येथील मच्छिमारांसह अनेक लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत. कोणी कुठल्याही पक्षातून लढला तरी हरकत नाही. माझा दागिना तुमच्या हातात दिला आहे, त्याचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा, असे सांगत चांगल्या माणसांची साथ नेहमी लागते. दीपक केसरकर त्यातीलच एक असल्याचेही ठाकरे यांनी सांगत त्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे तुकडे नाहीत
एकीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेनेच्या विरोधात लढत आहेत, तर दुसरीकडे पंचवीस वर्षांचा मित्र म्हणवून घेणारा भाजपही आमच्या विरोधात लढत आहे. या दोघांना आपली वेगवेगळी स्वप्ने साकार करायची आहेत. पण शिवसैनिक हा शिवाजी महाराजांचा मावळा आहे. तो कधीही गप्प बसणार नाही आणि महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पार्सल अबुधाबीला पाठवा
माजी आमदार दीपक केसरकर यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पार्सल मुंबईला पाठवूया, असे म्हटले होते. तोच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते पार्सल मुंबईला न पाठवता अबुधाबीला पाठवा. समुद्रामार्गे तिकडे दादा लोक जातात, असे सांगताच सभागृहात हास्याचे फवारे पसरले.